पुणे : दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी केंद्राचे पथक चार दिवसांच्या पुणे दौर्यावर येणार आहे. मंगळवारी (दि.12) पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्तालयात सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. त्यानुसार बैठकीत आढावा घेऊन बुधवारी पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर तालुक्यात दुष्काळाची प्रत्यक्ष पहाणी करणार आहेत. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने कृषी विभागाच्या केंद्रीय सचिव प्रिया रंजन यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाचे सदस्य आणि केंद्रातील विविध विभागांतील प्रमुख अधिकार्यांचे पथकात समावेश आहे.
पथकातील काही सदस्य नागपूर, अमरावती विभागाची पाहणी करणार असून, दुष्काळी पथकातील अध्यक्ष प्रिया रंजन आणि काही सदस्य पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी पुरंदर आणि बारामती तालुक्यांत गंभीर आणि शिरूर, इंदापूर व दौंड तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे, तर सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला, बार्शी या पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
पुरंदर आणि बारामती तालुक्यांतील सुमारे 13 हजार 237 हेक्टर क्षेत्रात पेरण्या होऊन 26 हजार 644 शेतकर्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. शिरूर, दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील एकूण 23 हजार 778 हेक्टरमध्ये पेरण्या झाल्या आहेत. पुरंदर तालुक्यात अवघा 299 मिलिमीटर (52 टक्के), तर बारामती तालुक्यात 265 मि.मी. (59 टक्के) पाऊस झाला आहे. त्यामुळे तीव्र दुष्काळाच्या झळा पुरंदर आणि बारामती तालुक्याला बसल्या आहेत.
हेही वाचा