Drought Affected Students Pudhari
पुणे

Drought Affected Students Exam Fee Waiver: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; शैक्षणिक संस्थांना शुल्क न घेण्याचे निर्देश

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा; अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठांत कृती समित्या

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली असून, या भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, यासाठी त्यांची परीक्षाशुल्कमाफीसह अन्य उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कोणत्याही शैक्षणिक संस्थेने घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेद्र देवळाणकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत.

डॉ. देवळाणकर म्हणाले, की दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासह विद्यार्थ्यांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयात मध्यवर्ती कक्ष आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये स्वतंत्र कृती समित्या (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठनिहाय संपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे अपुरा पाऊस झाल्याने राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती (ट्रिगर-१) घोषित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क माफी, शैक्षणिक अडचणी किंवा अन्य मदतीसाठी संबंधित विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळ तसेच विद्यार्थी विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयाने केले आहे.

दर पंधरा दिवसांनी आढावा

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, परीक्षा शुल्क माफी आणि अन्य मदतीच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर कृती समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षण संचालनालयाकडून प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. विद्यापीठांनी केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता विद्यार्थ्यांना कौटुंबिक भावनेतून सहकार्य करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी डॅशबोर्डाच्या विचारात

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र डॅशबोर्ड विकसित करण्याचा विचार आहे. या डॅशबोर्डद्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि समस्यांचे ट्रॅकिंग करून त्यांचा पाठपुरावा आणि वेळेत निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

अडचणींच्या निराकरणासाठी संपर्क अधिकारी नियुक्त

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे - डॉ. राजेंद्र तलवारे ९८९०६४२४३१, - डॉ. सविता कुलकर्णी ७७२००३६७७४, अजय ठुबे ७५८८१६९१३४.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT