Purandar Airport Landowner farmer Issue
सासवड: पुरंदर तालुक्यात होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शुक्रवारी (दि. 2) सुरू झालेला ड्रोन सर्व्हे स्थानिक शेतकर्यांनी बंद पाडला. सरकारच्या वतीने मोठा फौजफाटा मागविण्यात आला होता. तरी देखील स्थानिकांनी प्रचंड विरोध करीत हा ड्रोन सर्व्हे बंद पाडला. परंतु, सर्व्हे पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पुरंदर तालुक्यातील एखतपूर-मुंजवडी या गावातून हा सर्व्हे सुरू करण्यात येत होता. या वेळी ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘जय जवान जय किसान’, ‘या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. जमिनीची मोजणी करण्यासाठी शासनाने ड्रोन सर्व्हेचा निर्णय घेतला होता. यानंतर येथील ग्रामस्थांनी या ड्रोन सर्व्हेला विरोध केला होता, तरीही प्रचंड फौजफाट्यासह सर्व्हे सुरू करण्यात आला होता. (Latest Pune News)
पुरंदर तालुक्यामध्ये मागील आठ वर्षांपासून या आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रक्रिया सुरू आहे. मागील पाच वर्षांत हे विमानतळ दुसर्या जागेवर नेण्यात येणार, असे सांगण्यात येत होते. मात्र, मागील चार महिन्यांपासून या विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. जुन्याच म्हणजे पारगाव मेमाणे, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, वनपुरी, खानवडी, कुंभारवळण या गावांमध्ये हे विमानतळ होणार आहे. या भागातील लोकांकडून विमानतळाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
पोलिस आणि विमानतळ बाधित शेतकरी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. शेतकर्यांनी या ड्रोन सर्व्हेला तीव्र विरोध केला. स्थानिक लोकांचा पुरंदर विमानतळासाठी तीव्र विरोध असताना देखील सरकार या विमानतळनिर्मितीवर ठाम आहे. मागील महिनाभरात स्थानिक लोकांनी दोन आंदोलने केली होती. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद या शेतकर्यांना मिळाला नाही. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
‘त्या’ शेतकर्यांना अटक करणार
प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेला ड्रोन सर्व्हे रोखणार्या शेतकर्यांना अटक करण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. या शेतकर्यांवर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज एखतपूर या गावचा ड्रोन सर्व्हे पूर्ण झाला आहे. ड्रोन ही शासकीय मालमत्ता असून, काही शेतकर्यांनी या ड्रोनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.- वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी, पुरंदर
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प शासन जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर सातही गावांतील शेतकर्यांना इच्छामरणाची परवानगी द्यावी.- संतोष हगवणे बाधित शेतकरी
शुक्रवारी झालेला सर्वे रोखण्याचा प्रयत्न शेतकर्यांनी केल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि ड्रोनचे नुकसान केल्याबद्दल सरकारी मालमत्तेचे नुकसान अशा प्रकारचा गुन्हा या शेतकर्यांवर दाखल करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्हा दाखल केल्याचे अत्यंत गोपनिय ठेवण्यात आले आहे.
शेतकर्यांना ओळखण्यासाठी व्हिडीओ शुटींगचा आधार घेतला जाणार आहे. काहींची ओळख पटल्याने त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचे समजते. प्रशासनाने आंदोलक शेतकर्यांना रोखण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्याचे नक्की केल्याचे चित्र या परिसरात आहे.