

बारामती: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय श्री जय भवानीमाता पॅनेलच्या यादीत स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकीतून जवळपास माघार घेतली आहे.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, समन्वयक किरण गुजर, पृथ्वीराज जाचक यांनी श्री जय भवानीमाता पॅनेलच्या उमेदवारांची यादी शुक्रवारी (दि. 2) जाहीर केली. यामध्ये शरद पवारांच्या पक्षातील एकालाही स्थान मिळालेले नाही. (Latest Pune News)
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी खासदार सुप्रिया सुळे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि बारामती विधानसभेचे पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी वारंवार पक्ष यापुढील सहकारासह सर्व निवडणुका लढविणार असल्याचे घोषित केले होते.
परंतु, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी पूर्णपणे डावलल्यानंतरही पक्षाने आपला पॅनेल उभा करण्याचा विचारही केलेला नाही. यामुळे पक्षाचे या भागातील कार्येकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे.
..ही आहे शरद पवारांच्या पक्षाची भूमिका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर लगेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील यांनी बारामतीत पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत, आमचा पक्ष या निवडणुकीत ’तटस्थ’ राहणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, आमचे कोणतेही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते निवडणुकीत सहभागी होणार नाहीत. आम्ही कोणाच्या बाजूने अथवा विरोधात प्रचार देखील करणार नाही.
मतदानावेळी मात्र आम्ही सदसद्विवेकबुद्धीला स्मरून योग्य उमेदवारांना मतदान करू, कारखानाहितासाठी आम्ही जाचक यांना पाठिंबा दिला होता. खा. सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार यांनीही जाचक यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला होता. परंतु, त्या पॅनेलमध्ये आमच्या पक्षाला संधी दिली गेली नाही किंवा यादी तयार करताना विश्वासात देखील घेतले नाही. आम्हाला स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.