पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रगतस्कर ललित पाटील याला ड्रायव्हर दत्ता डोके (रा.हडपसर) याने दहा हजार रुपये दिल्याचे समोर आले. डोकेला शुक्रवारी हडपसर परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत अनेक बाबी समोर आल्या आहेत. पाटील याला ससूनमधून पळून जाण्यास कोणी-कोणी मदत केली याचादेखील शोध आता पोलिस घेत आहेत.
ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर पाटील याला चारचाकी गाडीतून पुण्याबाहेर मुंबईच्या दिशेने याच डोकेने सोडले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. डोके हा कारचालक ससूनच्या वाॅर्ड क्र. 16 मध्ये भरती असलेल्या एका आरोपीचा ड्रायव्हर असल्याची माहिती सूत्रांची आहे.
डोके हा यापूर्वीदेखील अनेकदा ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक सोळापर्यंत गेला आहे. तो ज्या व्यक्तीसाठी काम करतो, ती व्यक्ती त्याच वाॅर्डमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल आहे. तर त्याचा मालक आणि ललित पाटील हे दोघे मित्र आहेत. डोके हा तेथील अनेक आरोपींना ओळखतो. जेवणाचे डब्ब्यांबरोबरच इतर काही वस्तू लागल्या, तर तो त्यांना बाहेरून आणून देत होता. याला वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे.
आठ दिवसांपूर्वी (शनिवारी) ससून रुग्णालयाच्या गेटवरच गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दोन कोटींच्या मॅफेड्रॉन पकडून ललित पाटील रुग्णालयातून चालवित असलेल्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पाटील याच्या दोघा साथीदारांना अटक करण्यात आली, तर तो वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिस त्याला कारागृहातून आपल्या ताब्यात घेणार होते. मात्र, सोमवारी सात्री साडेसातच्या सुमारास पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो एक्सरे करण्यासाठी जात असताना, एका पोलिस कर्मचार्याला धक्का मारून नाट्यमयरित्या पळाला.
तो पळून गेल्यानंतर तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी दोन ते अडीच तासांनी पाटील फरार झाल्याचे नियंत्रण कक्षाला कळविले. त्यामुळे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. ससूनमधून बाहेर पडल्यानंतर त्याने थेट पंचतारांकित हॉटेल गाठले. पुढे तो तेथून एका चारचाकी गाडीत बसून पसार झाला. ती गाडी दुसरा तिसरा कोणी चालवत नसून तो डोके होता. डोकेने पाटीलला मुंबईकडे जाणार्या एक्स्प्रेस वेवर सोडण्याचे काम केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील याने पलायन करण्याचे नियोजन केल्याचे दिसते. अगोदरच तो आणि डोके एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. तो रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर कोठे भेटायचे ? गाडी कोण तयार ठेवणार ? हे ठरल्याचे दिसून येते. त्यानुसार पाटील बाहेर पडताच, त्याच्यासाठी काम करणार्या व्यक्ती अॅक्टीव झाल्या. त्यानंतर तो पसार झाला. डोके याने आपल्याकडील दहा हजार रुपये पाटीलला दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे. डोके याला पोलिसांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात ललित पाटील पलायनप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी करून अटक केली आहे. डोके याने रावेतपर्यंत पाटीलला सोडले असले, तरी त्याने मुंबईपर्यंत जाण्यासाठी चार ते पाच गाड्या बदलल्याची माहिती आहे.
डोकेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ललित पाटील थकला होता आणि त्याने पुढच्या चौकात सोडण्याची विनंती केल्याने आपण त्याला सोडले असल्याचे सांगितले होते तसेच तो पळून आल्याचे लक्षात आले त्यामुळे त्याला आपण पुढे मदत करण्याचे टाळले, असे सांगितले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच दत्ता डोके याने ललित पाटीलला रावेतला सोडले असून, 10 हजार दिल्याचे कबूल केले आहे.
ललित पाटीलला सोडणारा कारचालक हा वाॅर्ड क्र. 16 मध्ये उपचार घेणार्या हायप्रोफाइल आरोपीकडे काम करतो. त्यामुळे आता या प्रकरणात त्या आरोपीचीसुद्धा चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
ललित पाटीलचा भाऊ पाटील अॅग्रो अॅण्ड अॅनिमल इन्काॅर्पोरेशन नावाची कंपनी नाशिक शहरातील म्हसोबा मंदिर उपनगर येथून चालवत होता. त्याची कंपनी शेळ्यांची निर्यात दुबई आणि यूएईत करत होती. त्यामुळे विदेशातदेखील पाटील बंधू व्यवहार करत असल्याचे दिसून येते. अशातच भूषण पाटील चालवित असलेल्या शिंदे गावातील ड्रगचा कारखाना साकीनाका पोलिसांच्या पथकाने उद्ध्वस्त केला. त्यामुळे भूषण आणि ललित पाटील आणखी कोणते व्यवसाय करत होते? याचा तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा