Law Pudhari
पुणे

Pradeep Kurulkar Espionage Case: डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर प्रकरणाला तीन वर्षांनी गती; पहिल्या पंचाची न्यायालयात साक्ष

पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपातील खटल्याची सुनावणी सुरू; जप्त मोबाईल व आरोपीची न्यायालयात ओळख पटवली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: संवेदनशील शासकीय गोपनीय माहिती शत्रुराष्ट्र पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केलेला डीआरडीओचा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या गाजलेल्या खटल्याच्या सुनावणीला तब्बल तीन वर्षांनंतर सोमवारी (दि. १३ जुलै) विशेष सत्र न्यायालयात सुरुवात झाली. विशेष सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात पहिल्या सरकारी पंचाची साक्ष नोंदविण्यात आली. या वेळी पंच साक्षीदाराने एटीएस कार्यालयात पंचनामा करताना पाहिलेल्या डॉ. कुरुलकर याची न्यायालयातील आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेले असतानाही अचूक ओळख पटवली.

पुणे दहशतवादविरोधी पथक २०२३ मध्ये डॉ. कुरुलकरला अटक केली होती. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या ऑपरेटिव्हशी (पीआयओ) संपर्क साधून संवेदनशील संरक्षणविषयक माहिती पुरवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्याबाबत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पंचाची सरतपासणी घेतली. त्यामध्ये पंचाने सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तो एटीएस कार्यालयात गेला.

तेथे उपस्थित असलेल्या डॉ. कुरुलकर याला त्याला दाखविण्यात आले. त्यानंतर डॉ. कुरुलकर याच्याकडील वनप्लस ६०/१० मोबाईल त्याच्या समक्ष जप्त करण्यात आला. तसेच, त्यांच्या अंगावरील सोन्याची साखळी आणि अंगठी त्यांच्या पत्नीच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर एटीएसचे अधिकारी पंचांना घेऊन डीआरडीओ कार्यालयात गेले. कार्यालयप्रमुखांच्या उपस्थितीत डॉ. कुरुलकर याचे कार्यालय उघडण्यात आले. खोलीची सखोल झडती घेण्यात आली; मात्र कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. या झडतीचा पंचनामा पूर्ण केला असून, कार्यालयाचे रफ स्केचही तयार करण्यात आले होते, असे पंचाने न्यायालयात सांगितले.

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने खाकी लिफाफ्यातील जप्त मोबाईल न्यायालयात सादर केला. पंच साक्षीदाराने तोच मोबाईल असल्याची ओळख पटवली. तसेच, डॉ. कुरुलकर याच्याकडून जप्त केलेल्या वस्तूंचीही न्यायालयात ओळख निश्चित केली. याच दिवशी दुसऱ्या पंचनाम्याबाबतही साक्ष नोंदविण्यात आली. भारतीय हवाई दलातील एका अधिकाऱ्याने एटीएसकडे जमा केलेल्या लाल रंगाच्या आयफोन ११ मोबाईलचा पंचनामा केल्याचे साक्षीदाराने सांगितले. त्या वेळी मोबाईलमधील जिओचे सिम कार्ड तसेच कव्हरमध्ये ठेवलेले एअरटेलचे सिम कार्ड काढून ते खाकी लिफाफ्यात सीलबंद करण्यात आले.

या पंचनाम्यावर सहकारी पंच, तपासी अधिकारी सुजाता तानवडे आणि स्वतःची स्वाक्षरी असल्याचेही त्याने स्पष्ट केले. उलटतपासणीत बचाव पक्षाचे ज्येष्ठ वकील ऋषिकेश गानू यांनी पंचाला एटीएस कार्यालयातील प्रक्रिया, डीआरडीओ कार्यालयातील झडती, मोबाईलची जप्ती, पंचनाम्याची पद्धत तसेच तपासावेळी घडलेल्या घटनांबाबत सविस्तर प्रश्न विचारले. पंचनामा एटीएस कार्यालयात बसून तयार केल्याचा दावा बचाव पक्षाने केला; मात्र सर्व कारवाई आपल्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि पंचनाम्यात नमूद केल्याप्रमाणेच झाल्याचे पंचाने ठामपणे सांगत हा दावा फेटाळून लावला. या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सरतपासणी, तर बचाव पक्षातर्फे ज्येष्ठ वकील ऋषिकेश गानू यांनी उलटतपासणी केली. तीन वर्षांनंतर या बहुचर्चित खटल्यातील साक्षीपुराव्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सुनावणीला आता वेग येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT