पुणे; पुढारी वृत्तसेवा : गडकिल्ल्यांचे संवर्धन करताना त्या ठिकाणी सौरऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी. गडकिल्ल्यांच्या ठिकाणांचे पावित्र्य राहील, यासाठी व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामांचा डॉ. नीलम गोर्हे यांनी आढावा घेतला, त्या वेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
बैठकीत अष्टविनायक विकास आराखडा सद्य:स्थिती, एकवीरादेवी शाश्वत विकास व पर्यायी रस्ता, आळंदी पाणीपुरवठा, शहरी भागातील वाहतूक कोंडी, मुळशी येथील अग्निशमन केंद्राची स्थिती, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रश्न, राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंमलबजावणीत येणार्या अडचणी आणि गडकिल्ले संवर्धनाचा आढावा घेण्यात आला.
देवस्थानच्या ठिकाणी पायर्यांच्या दोन्ही बाजूस कठडे आणि रॅम्पची सोय, गर्दी व्यवस्थापन तसेच काही ठिकाणी विसाव्याची सोय करण्यात यावी. मंदिराचे जतन आणि संवर्धन करतांना पुरातत्व विभागाच्या सूचनांचे कटाक्षाने पालन होईल, याकडे लक्ष द्यावे. लेण्याद्री देवस्थान येथील सोलर दिव्यांची सुविधा लवकर करण्यात यावी. आराखडा तयार करताना अग्निरोधक यंत्रणेचाही समावेश करण्यात यावा, अशा सूचना डॉ. गोर्हे यांनी दिल्या.
पुणे शहर आणि ग्रामीण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. अधिक शाळा-महाविद्यालये असणार्या भागात प्रायोगिक तत्त्वावर अर्ध्या तासाने शाळांची व खासगी कार्यालयांची वेळ बदलून वाहतुकीवर होणारा परिणाम अभ्यासा, अशी सूचना डॉ. गोर्हे यांनी केली.
हेही वाचा