पुणेः थोर खगोल शास्त्रज्ञ प्रा.डॉ.जंयत नारळीकर यांनी मला खूप मार्गदर्शन केले. खास करुन मराठी विज्ञान परिषदेची उभारणी करीत तीला दिशा देण्याचे मोठे काम त्यांनी केले. असे उदगार राष्ट्रीय अणूउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांनी काढले.
आयुका संस्थेच्या वतीने आयोजित दिवंगत खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय अणूउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ते खास मुंबई येथून या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी डॉ.दा.कृ.सोमण, आयुकाचे संचालक डॉ.रघुनाथ श्रीआनंद, डॉ.नारळीकर यांची मुलगी प्रा.लिलावती, प्रा.संजीव धुरंदर यांनी त्यांच्या आठणींना सांगितल्या. यावेळी विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी,शिक्षक यांनी गर्दी केली होती
डॉ.नारळीकर यांची मुलगी प्रा.लिलावती यांनी बाबांच्या आठवणी सांगितल्या.त्या म्हणाल्या की, आम्ही कोणत्या विषयात करीअर करावे या बाबत त्यांचा आग्रह कधीच नव्हता.ते प्रचंड व्यस्त होते. जागतिक शास्त्रज्ञ होते तरी एक चांगले बाबा मी अनुभवले. कुटुंबाला व्यस्त जीवनातूनही वेळ देत. त्यांना गोष्टी सांगण्याची आवड होती. शेवटच्या काळात बाबांनी खाण्याच्या काही फर्माईश केल्या यात त्यांनी बिर्याणी, चॉकलेट आणि आंबे मागितले.
खगोल शास्त्रज्ञ डॉ.दा.कृ.सोमण यांनी सांगितले की, आयुका संस्था 1986 ते 1988 या कालावधीत साकारत होती. त्यावेळी वैयक्तीक संगणक, ई-मेल आयडी हा प्रकार भारतात अस्तित्वात नव्हता. ते प्रथम देण्याचे काम डॉ.नारळीकर सरांनी केले. त्यांनी अमेरिकेतून संगणक मागविण्याची परवानगी सरकार कडून मिळवली. देशातील पहिले वेबपेज आयुका ने तयार केले.
आपल्या देशात इंटरनेट आणि ब्रॉडबॅन्ड उशीरा आले. आयुका मध्ये त्याची नितांत गरज होती. डॉ.नारळीकर सरांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांना फोन केला आणि महाजन यांनी देखील तात्काळ आयुका मध्ये तशी सुविधा दिली अशी आठवणही एका विद्यार्थाने सांगितली.
आयुका संस्थेचे संचालक डॉ.रघुनाथ श्रीआनंद म्हणाले, मी भुवनेश्वरला शिकत होतो. त्यावेळी डॉ.नारळीकर कोण हे माहित नव्हते. तेथे त्यांचे जाहीर व्याख्यान होते. ते ऐकून मी प्रेमात पडलो. कार्यक्रम झाल्यावर भेटलो , तर मला त्यांनी पुणे आयुका येथे ये असे सांगितले. आणि आज मी येथे संचालक आहे. नारळीकर सर खूप प्रेमळ, मिश्किल आणि खिलाडू वृत्तीचे होते.त्यांना क्रिकेट खेळाची आवड होती.टेस्ट मॅच सुरु झाली की, संशोधनात मग्न असलेले सर आम्हाला दर पाच मिनीटांनी स्कोर विचारत असत. ते विद्यार्थासमवेत क्रिकेटही खेळले आहेत.