

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ, प्रसिद्ध विज्ञान लेखक आणि वक्ते म्हणजेच डॉ. जयंत नारळीकर! अनेक दशकांच्या या बहुआयामी प्रवासात त्यांनी खगोलशास्त्रावरील संशोधनांनी अन् विज्ञानविषयक लेखनाने प्रत्येकाच्या मनात एक स्थान निर्माण केले. त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे अन् त्यांचे योगदानही प्रेरित करणारे आहे. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे; पण त्यांचा जीवन प्रवास येणार्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहे. त्यामुळेच त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत..!
डॉ. नारळीकर शालेय जीवनातील आठवणींबाबत म्हणतात... तेव्हा मी तिसरीत होतो. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना विचारले गेले की, तुमचे वडील काय काम करतात? आमची शाळा बनारस हिंदू युनिर्व्हसिटीच्या आवारात असल्याने आम्हा बहुतेक विद्यार्थ्यांचे वडील विद्यापीठात शिक्षक होते किंवा इतर कर्मचारीवर्गापैकी एक होते. ‘माझे वडील प्राध्यापक आहेत,’ मी उत्तरलो. प्राध्यापक, पण कुठल्या विषयाचे? या शिक्षकांच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते. तेव्हा त्यांनीच ते सांगितले, तुझे वडील गणिताचे प्रोफेसर आहेत, हे ऐकून मला खूप आनंद वाटला. कारण, गणित हा माझ्या आवडीचा विषय होता आणि आपल्याला सर्वात प्रिय असलेला विषय वडिलांचाही आहे, ही जाणीव मन सुखावून गेली. हा किस्सा सांगण्याचे कारण की, आपला विषय गणित म्हणून मुलानेही गणितात गोडी दाखवावी, अशी सक्ती माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीच केली नाही. कधी कधी वडिलांच्या आवडीनिवडी मुलांवर लादल्या जातात, तशी स्थिती माझ्याबाबतीत नव्हती. पुढे केंब्रिज विद्यापीठातील शिक्षणाबद्दलचाही किस्सा ते सांगतात, माझे वडील उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले. त्यांच्याप्रमाणे आपणही केंब्रिजच्या गणित ट्रायपॉसची परीक्षा द्यावी, असे मला वाटू लागले.
कठीण प्रश्नांसाठी गाजलेल्या या परीक्षेचे आव्हान पेलावे, असा निर्णय मी घेतला. बनारस विद्यापीठाची बीएस्सी परीक्षा झाली की, केंब्रिजला जावे, या माझ्या निर्णयाला पूर्वी यशस्वीपणे या मार्गाने गेलेल्या माझ्या वडिलांनी प्रोत्साहन दिले. केंब्रिजला विद्यापीठाला जाण्याच्या मार्गात अनेक अडथळे होते. सुदैवाने माझ्या बाबतीत अनेक कारणांमुळे या अडथळ्यांवर मला मात करता आली. आर्थिक अडचणींवर उपाय सापडला तो जे. एन. टाटा एंडाऊमेंटच्या शिष्यवृत्तीमुळे. हेच करिअर मी निवडावे असा सल्ला मला अनेकांनी दिला. त्यात प्रतिष्ठित सिनिअर रँग्लरचा किताब मिळवलेल्या आप्पासाहेब परांपजे यांचाही समावेश होता. खुद्द आप्पासाहेब केंब्रिज गाजवून भारतात परतले तेव्हा प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या आय. सी. एस.कडे (इंडियन सिव्हिल सर्व्हिस) जातील, अशी अपेक्षा होती; पण त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. त्यावेळी मी आप्पासाहेबांना दिलेले उत्तर होते, नाही सर, मी शिक्षण आणि संशोधनाला वाहून घेणार आहे. खगोल विज्ञानाच्या दिशेने वाटचाल कशी सुरू झाली, याबद्दल डॉ. नारळीकर हे आपल्या एका पुस्तकात म्हणतात, माझे आकाशाशी नाते जडले ते केंब्रिजमध्ये. गणिताच्या ट्रायपॉसच्या उच्च परीक्षेसाठी तयारी करताना फ—ेड हॉईल यांचे फ्रंटियर्स ऑफ अॅस्ट्रॉनामी हे पुस्तक वाचनात आले. जनसामान्यांसाठी लिहिलेले आणि केंब्रिज नगरपालिकेतल्या सार्वजनिक वाचनालयातून आणलेले. ग्रह-उपग्रहांच्या मर्यादित कक्षांपलीकडे जाऊन तार्यांच्या अंतरंगाचा, आकाशगंगेच्या विविधरंगी छटांचा, त्यापलीकडे मानवी डोळ्यांना न दिसणार्या; पण दुर्बिणीतून प्रकट होणार्या तारकांविश्वांचा सांगोपांग अभ्यास करता येतो आणि तोही आपल्याला सुपरिचित असलेल्या विज्ञानाच्या चौकटीत राहून, हा मला एक अनपेक्षित साक्षात्कार होता. सुदैवाने हॉईल त्यावेळी केंब्रिज विद्यापीठात प्राध्यापक होते आणि खगोल विज्ञानावर त्यांची व्याख्याने ऐकण्याची मला संधी मिळाली आणि पुढे मी गणिताचा आधार घेत घेत खगोल विज्ञानाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
वाचनाकडे कसा वळलो, हा प्रवास डॉ. नारळीकरांनी अनेक ठिकाणी बोलका केला आहे. त्याबद्दल त्यांनी एका लेखात म्हटले आहे की, अनेक वर्षांनी खगोल विज्ञानात संशोधन करता करता आपणही त्या विषयातून मिळणारा आनंद आणि उत्तेजना यात इतरांना सहभागी करून घ्यावे असे वाटू लागले आणि यासाठी जनसामान्यांपुढे या विषयावर भाषणे देण्याचा उपक्रम सुरू केला. मायबोलीतून हा उपक्रम यशस्वी ठरतो आहे, हे माझ्या लवकरच ध्यानात आले. महाराष्ट्रात किंवा बृहन्महाराष्ट्रातल्या मराठी भाषकांसमोर मराठीतून केलेले भाषण हृदयाला जाऊन भिडते तसे इंग्रजीतले भाषण नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच मराठीतून लेखन केले.
‘चार नगरांतील माझे विश्व’ या आत्मचरित्रासाठी डॉ. नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सगळीकडून डॉ. नारळीकरांचे अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी भावना व्यक्त करताना डॉ. नारळीकर म्हणाले, माझे बालपण आणि डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण बनारस येथे झाले. केंब्रिजमध्ये उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत टाटा रिसर्च सेंटरमध्ये काम आणि आता पुण्यात स्थायिक असा माझा प्रवास झाला. कोणतेही एकच ठिकाण माझ्या सर्वाधिक आवडीचे नाही, तर चारही ठिकाणे मला आवडतात. या प्रत्येक शहरांनी मला चांगले क्षण दिले. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव दिले आहेत. पुस्तक लिहिताना त्याला पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. मी स्वतःच्या समाधानासाठी लेखन केले होते. या प्रवासातील आठवणी या आत्मचरित्रात सोप्या भाषेत लिहिल्या आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्काराने डॉ. जयंत नारळीकर यांना सन्मानित करण्यात आले होते, तेव्हा पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. नारळीकर यांचे झालेले भाषणही त्यावेळी गाजले. कार्यक्रमात डॉ. नारळीकर म्हणाले की, अंधश्रद्धेविरोधात व्यापक मोहीम उघडणे अत्यंत गरजेचे असून, चर्चा करून, वस्तुस्थिती मांडून विज्ञानवाद लोकांना पटवून द्यावा लागेल. देश विज्ञानात प्रगती करत असताना दुसर्या बाजूला अंधश्रद्धा समाजात फोफावत आहेत. विकासास मारक ठरणार्या अंधश्रद्धेविरोधात व्यापक मोहीम उघडणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावरही डॉ. नारळीकर यांनी त्याबाबतचा आनंद व्यक्त केला. त्यावेळी दै. ‘पुढारी’शी बोलताना डॉ. नारळीकर म्हणाले, महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. 1972 पासून मी महाराष्ट्रात कार्यरत आहे. मी आतापर्यंत केलेल्या कामाला या पुरस्काराच्या निमित्ताने राज्य शासनाने दाद दिली, याचा मला मनापासून आनंद आहे. 1972 मध्ये मी भारतात परतलो, तेव्हापासूनच मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र ही खर्या अर्थाने माझी कर्मभूमी राहिली आहे. आतापर्यंत जे काम केले, त्याचेच हे कौतुक आहे.