पुणे

Dr. Dabholkar murder case : धायडेने अंदुरेला ओळखले हे खोटे; बचाव पक्षाचा दावा

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादमधील गारखेडा भागातील गजानन मंदिरासमोर झालेल्या हिंदू जनजागरण समितीच्या बैठकीदरम्यान सचिन अंदुरे याची भेट झाल्याची साक्ष सोमनाथ धायडे याने दिली. त्यानुसार, बचाव पक्षाने कडा येथे बैठक झाल्यासंदर्भातली कागदपत्रे जलसंपदा खात्याकडून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविली. परंतु, गारखेडा आणि कडा एकच आहे हे दाखविणारा कोणताही पुरावा नाही. धायडेला पोलिसांनी धमकावून आणले आणि त्याने हिंदू जनजागृती सभेमध्ये सचिन अंदुरेला ओळखले हे खोटे सांगितले असल्याचा दावा बचाव पक्षाने केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी (दि. 26) बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर व सुवर्णा आव्हाड यांनी अंतिम युक्तिवाद केला. बचाव पक्षाने सीबीआयच्या तपासातील विरोधाभास दाखविण्याचा प्रयत्न केला. साक्षीदार विनय केळकर यांनी सुरुवातीला बाल्कनीमधून बघितले की, दोन माणसे पळत येत होती आणि एक व्यक्ती जमिनीवर पडला. तर, दुसर्‍या वेळी दोघांनी गोळ्या झाडल्या आणि तिसर्‍या गोष्टीत पांढरी टोपी घातलेल्याने गोळ्या झाडल्या. यातले खरे काय? याशिवाय दुसरा साक्षीदार कांबळे न्यायालयात सांगतो की, अंदुरेने हे केले नाही.
मग दुसर्‍यांदा अंदुरेला न्यायालयात कसे ओळखतो? याकडे अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. दरम्यान,  दोघेही टोप्या घालून होते तर साक्षीदार विनय केळकर यांना दोनशे मीटरवरून ते कसे काय दिसले? असा युक्तिवाद अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड यांनी केला.
शरद कळसकर याने जिथे पिस्तूल टाकले ते मिळाले नाही. पण, सीबीआय त्याला निर्दोष मानत नाही. बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ज्यांच्याकडे पिस्तूल मिळाले आहे, त्यांनीच गोळ्या मारल्या आहेत असे गृहीत धरले जाते. मात्र, ज्याच्याकडे पिस्तूल मिळाले नाही त्याला दोषी ठरवा आणि ज्यांच्याकडे पिस्तूल मिळाले त्यांना सोडा म्हणतात हे का? असा सवाल बचाव पक्षाने उपस्थित केला.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT