एका नऊ वर्षांच्या मुलामध्ये ट्युमरचे निदान झाले. प्रयत्नांची शर्थ करूनही डॉक्टर मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत. त्याला ब्रेनडेड घोषित केले. पालकांनी संमती दिल्यावर मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला.
अवयवदानामुळे चार रुग्णांना जीवदान मिळाले. अवयवदाता वयाने लहान असल्याने दोन अनिवार्य अॅप्निया चाचण्या १२ तासांच्या अंतराने घेण्यात आल्या. त्यामुळे त्याला ८ जुलै रोजी ब्रेनडेड घोषित करण्यात आले. तर मेंदूच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राची प्रक्रिया ९ जुलै रोजी पूर्ण झाली. वैद्यकीय चाचण्यांनंतर ९ जुलै रोजी अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली.
मुलाचे यकृत, स्वादुपिंड, दोन्ही मूत्रपिंड आणि फुफ्फुस हे अवयव शहरातील विविध रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, मेंदूमृत मुलगा नियमित शाळेत जात होता. त्याच्यावर नियमित उपचार सुरू होते. मात्र, त्याची प्रकृती बिघडल्याने ३ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करावे लागले. गेल्या वर्षी त्याच्या आईचे निधन झाले होते.
मुलाचे निधन झाल्यावर वडिलांनी आणि नातेवाइकांनी अवयवदान करण्यास सहमती दर्शवली. इनलॅक्स आणि बुधराणी हॉस्पिटलमध्ये झालेले हे पहिले अवयवदान होते. अवयवांच्या सुरळीत वाहतुकीसाठी पुणे पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. शुक्रवारपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांत सर्व अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये क्रॉनिक किडनीचा आजार असलेल्या ६४ वर्षांच्या पुरुषामध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. यावर्षी जानेवारी महिन्यापासून, पुणे झेडटीसीसीने ३६ अवयवदात्यांकडून अवयवदान करण्यात आले आहे. या आठवड्याभरात चार मृत व्यक्तींकडून प्रत्येकी एक-एक अवयव दान झाले आणि १५ जणांमध्ये अवयव प्रत्यारोपण केले. यामध्ये आठ मूत्रपिंड, दोन यकृत, एक विभाजित यकृत, एक हृदय आणि एक फुफ्फुसाची जोडी यांचा समावेश आहे.
66 आमच्याकडे अॅडमिट असलेल्या ५ महिन्यांच्या एका रुग्णाला यकृत आणि हृदयाचा आजार आहे. रुग्णाला जगवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता. त्यामुळे मेंदूमृत रुग्णाच्या यकृताचा काही भाग लहान बाळामध्ये, तर काही भाग एका प्रौढ रुग्णामध्ये प्रत्यारोपण करण्यात आला. दुर्दैवाने अर्भकाचे हृदयविकारामुळे निधन झाले. दरम्यान, ४७ वर्षांच्या वृद्ध रुग्णाला यकृताचा काही भाग देण्यात आला असून, त्यांची तब्येत अद्याप स्थिर नाही.डॉ. प्रसाद मुगळीकर, वैद्यकीय संचालक, रुबी हॉल क्लिनिक