पुणे

पिंपरी शहरात श्वानांची दहशत; पाच महिन्यांत नऊ हजार नागरिकांना रेबीजची लस

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : शहरामध्ये सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. पादचारी, दुचाकी वाहनचालक यांच्यावर धावून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. रात्री कामावरून घरी परतणारे कामगार, जेवणानंतर घराबाहेर फिरण्यासाठी पडलेले नागरिक यांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शहरात चालू वर्षात एप्रिल ते ऑगस्ट अशा पाच महिन्यांच्या कालावधीत नऊ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. कुत्र्याचे नख लागून खरचटणे, भटक्या आणि पाळीव कुत्र्यांनी घेतलेला चावा अशा विविध कारणांमुळे नागरिकांनी ही लस घेतली आहे. महापालिका आणि खासगी रुग्णालयांकडून महापालिका वैद्यकीय विभागाला ही संकलित माहिती मिळाली आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय विभागाकडून गेल्या वर्षभरात साडेतीन हजार श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

श्वानांकडून चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ

शहरामध्ये चालू वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत एकूण 9 हजार 284 नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. तर, 2022-23 या आर्थिक वर्षात 18 हजार 500 जणांना ही लस दिली आहे. लसीकरण केलेल्या संख्येचा आधार पकडून महापालिका वैद्यकीय विभागाकडे तेवढे श्वानदंश झाल्याची नोंद आहे. तथापि, कुत्र्याचा नख लागून खरचटणे आणि चावा अशा दोन्ही कारणांसाठी नागरिक रेबीज प्रतिबंधक लस घेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जेवढ्या नागरिकांनी रेबीजची लस घेतली आहे, तेवढ्या नागरिकांना प्रत्यक्ष श्वानदंश झाला आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही.

नागरिकांमध्ये दहशत

शहरातील विविध भागांमध्ये श्वानांची एकप्रकारे दहशतच निर्माण झाली आहे. दुचाकीवरुन जाणार्या वाहनचालकांवर ते धावून जातात. विशेषतः रात्री कामावरुन घरी परतणार्या कामगारांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे, सकाळी किंवा सायंकाळी घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या अंगावर कुत्री धावून जातात. त्यामुळे पायी ये-जा करणार्या नागरिकांना आपल्या आजूबाजूला कोठे कुत्रा तर नाही ना, हे पाहतच फिरावे लागते.

साडेतीन हजार श्वानांचे लसीकरण

महापालिका पशुवैद्यकीय विभागाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कॅनॉयन कंट्रोल अ‍ॅण्ड केअर या संस्थेकडे श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण आदी जबाबदारी सोपविली. हे काम सीएसआर फंडातून केले जात आहे. त्यामुळे त्याचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडत नसल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी दिली.

श्वानाचे नख लागले तरी नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीजचे लसीकरण करून घेतात. त्यामुळे जेवढ्या नागरिकांना रेबीजचे लसीकरण केले आहे, तेवढ्या नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही. गेल्या वर्षभरात 3 हजार 500 श्वानांना पकडून त्यांचे सीएसआर फंडातंर्गत खासगी एजन्सीकडून निर्बिजीकरण केले आहे. तसेच, त्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण देखील केले आहे.

– डॉ. अरुण दगडे,
पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.

महापालिकेकडील श्वानदंशाची (रेबीज लसीकरण) नोंद
वर्ष श्वानदंश (रेबीज लसीकरण)
2018-19 14842
2019-20 12751
2020-21 13832
2021-22 13892
2022-23 18500
2023-24 9284
(एप्रिल ते ऑगस्ट)

हेही वाचा

SCROLL FOR NEXT