Rabies Vaccine Pudhari
पुणे

Pune Dog Bite Vaccine: 'पुढारी'च्या बातमीचा परिणाम! हवेलीतील दवाखान्यांना श्वानदंश लसींचा तातडीने पुरवठा

लसींच्या तुटवड्यावर प्रशासन जागे; प्रत्येक केंद्राला 50 डोस उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

लोणी काळभोर: हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील सरकारी आरोग्यव्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड करणाऱ्या दै. ‌‘पुढारी‌’च्या बातमीचा अखेर मोठा परिणाम दिसून आला आहे. श्वानदंश आणि सर्पदंश लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, तातडीने पूर्व हवेलीतील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना प्रत्येकी श्वानदंशावरील 50 लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

कुंजीरवाडी येथील सरकारी दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने एका लहान मुलाला खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर दै. ‌‘पुढारी‌’ने केलेल्या सडेतोड वृत्तांकनामुळे प्रशासनावर दबाव वाढला आणि आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदस्तरावरून तातडीने लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पूर्व हवेलीतील सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये प्रत्येकी 50 डोस पोहचविण्यात आले आहेत, तसेच पुढील काळात लसींचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नियमित पुरवठासाखळी मजबूत करण्याचे देखील नियोजन करण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख स्वप्निल कुंजीर पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत करीत नागरिकांच्या जिवाशी संबंधित प्रश्नावर दै. पुढारीने आवाज उठवला आणि प्रशासनाला जाग आणली, हे सकारात्मक आहे. मात्र, भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

ग्रामीण भागातील नागरिकांनीही या तातडीच्या निर्णयाचे स्वागत केले असून, आता किमान आपत्कालीन परिस्थितीत लस मिळेल, अशी भावना व्यक्त केली आहे. मात्र, आरोग्यव्यवस्थेतील त्रुटी कायमस्वरूपी दूर करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत, अशी मागणीही जोर धरत आहे.

जिल्हापातळीवरून पूर्व हवेलीतील सर्व सरकारी दवाखान्यांना 50 श्वानदंश लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी
पूर्व हवेलीतील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांना आवश्यक त्या प्रमाणात श्वानदंश लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
डॉ. सुरेश गोरे, तालुका आरोग्य अधिकारी, हवेली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT