पुणे : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रुग्णसेवेसाठी कमला नेहरू रुग्णालयात दिवसभर हजर राहणे अपेक्षित आहे. मात्र, काही वरिष्ठ डॉक्टरांची केवळ मस्टरवर हजेरी लागते. काहीवेळा ते सही करून निघून जातात, तर काहीवेळा कनिष्ठ डॉक्टरच वरिष्ठ डॉक्टरांची हजेरी लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यावर महाविद्यालयाला नोटीस बजाविण्यात आली आहे.(Latest Pune News)
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात दररोज एक ते दीड हजार रुग्ण उपचारासाठी येतात. सकाळच्या वेळेमध्ये सर्वच विभागांच्या ओपीडीमध्ये रुग्णांची गर्दी असते. बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांसह ॲडमिट असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी विभागप्रमुखांनी दिवसभर रुग्णालयात उपलब्ध राहणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे.
रुग्णालयातील काही विभागप्रमुख आणि वरिष्ठ डॉक्टर उपस्थितीबाबत गांभीर्य पाळत नसूनही त्यांचे पगार नियमितपणे काढले जातात. याबाबत, रुग्णालय प्रशासनाने कठोर पावले उचलून ऑनलाइन हजेरीत गडबड झाल्याने एक-दोन महिन्यांचा पगार थकविण्यात आला होता. मात्र, याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाने अशी कोणतीही अनियमितता होत नसल्याचे म्हटले होते.
डॉक्टरांच्या बेजबाबदार कारभाराबद्दल आक्षेप नोंदविण्यात आला आहे. आरोग्य विभागाने या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा प्रतिनिधी यांना नोटीस बजावली आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाकडून खुलासा सादर करण्यात आला असून, डॉक्टरांना समज दिली जाईल आणि कारवाई केली जाईल असे आश्वासन लेखी स्वरूपात दिले आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
रुग्णालयातील सर्जरी, मेडिसीन आणि इमर्जन्सी मेडिसीन विभागात प्रमुख डॉक्टर हजर राहत नाहीत. हजेरी पुस्तकावर त्यांच्या जागी कनिष्ठ किंवा वरिष्ठ रहिवासी डॉक्टरांकडून सही करून घेतली जाते. काही प्राध्यापक केवळ एकदाच सही करून दिवसात पुन्हा दिसत नाहीत. वर्गाचे वेळापत्रक नाही, लेक्चर घेतल्याचा ठोस पुरावा नाही. आठवड्यातून दोन ते तीन दिवसच रुग्णालयात हजेरी लावली जाते, राउंडही नियमितपणे घेतले जात नाहीत.
महाविद्यालयातील डॉक्टर नियमितपणे कमला नेहरू रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत. काही ठिकाणी वेळेच्या शिस्तीबाबत किरकोळ अडचणी आढळल्या असून, त्या सुधारण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. आरोग्य विभागाने काही प्रशासकीय सूचना दिल्या आहेत. परंतु, कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. वाढत्या रुग्णभारानुसार खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे.डॉ. शिल्पा प्रतिनिधी, प्रभारी अधिष्ठाता, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय