Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Pudhari
पुणे

Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla: माउलींच्या पालखी सोहळ्याची आळंदीत नगरप्रदक्षिणेने सांगता; वारकऱ्यांनी धरली परतीची वाट

आषाढी वारीनिमित्त आळंदी-पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा; एकादशीला पालखी नगरप्रदक्षिणा, हजेरी मारुती मंदिरात दिंड्यांचा सोहळा

पुढारी वृत्तसेवा

आळंदी: सुमारे महिनाभराचा पायी प्रवास, आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी परतीचा प्रवास करीत आळंदीत दाखल झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची रविवारी (दि. ९) एकादशीला पालखी नगरप्रदक्षिणेने सांगता झाली.

यंदाच्या सोहळ्यात आळंदी, पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा रममाण झाल्याचे दिसून आले. उच्चांकी गर्दीने यंदाचा सोहळा लक्षवेधी ठरला. रविवारी आळंदीत नगरप्रदक्षिणा पार पडल्यानंतर वारकऱ्यांनी आता परतीची वाट धरली आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याची एकादशीला पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. पहाटे दैनंदिन पूजाविधी झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले होते. कामिका एकादशीनिमित्त राज्यभरातून दाखल झालेले भाविक, पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरवरून आळंदीत दाखल झालेले वारकरी, यामुळे आळंदी गजबजून गेली होती. दुपारी एक वाजच्या सुमारास माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडली.

महाद्वार, इंद्रायणी घाट, प्रदक्षिणा रस्तामार्गे पालखी वडगाव चौक येथून हजेरी मारुती मंदिरात विसावली. या वेळी नाईकांच्या वतीने परतीच्या दिंड्यांमधील विणेकरी, मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. दिंड्यांच्या हजेरीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालखी सायंकाळी मंदिरात दाखल झाली.

मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर देऊळवाड्यात माउलींची आरती झाली. त्यानंतर संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. दरम्यान, पायी वारी पालखी सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर वारकऱ्यांनी सायंकाळी परतीची वाट धरली. यामुळे बसस्थानक, एसटी थांबा, खासगी प्रवासी वाहतूक आदी ठिकाणी वारकऱ्यांची गर्दी दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT