Dnyaneshwar Maharaj Palkhi Pudhari
पुणे

Dnyaneshwar Maharaj Palkhi: ‘ज्ञानोबा-माउली’च्या जयघोषाने पुणे दुमदुमले; ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

भवानी पेठेतील विठोबा मंदिरात भक्तीचा महासागर; पुणेकरांकडून वारकऱ्यांचा उत्स्फूर्त पाहुणचार, आज पालखी सासवडकडे मार्गस्थ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विठुरायाच्या भेटीची आस मनात बाळगून पंढरपूरच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी गुरुवारी पुण्यनगरीत विसावला. भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्कामासाठी आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण होते. 'ज्ञानोबा-माउली-तुकाराम', 'माउली, माउली'च्या अखंड जयघोषाने भवानी पेठ दुमदुमले, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी गुरुवारी रात्रीपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी दिवसभर दर्शनासाठी भाविकांचा ओघ कायम होता.

शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची महापूजा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासूनच हजारो भाविकांनी कुटुंबीयांसह रांगा लावत माउलींच्या पादुकांचे दर्शन घेत विठ्ठलनामाचा गजर केला. प्रत्येक दिंडीत पहाटे काकड आरती, दिवसभर हरिनाम संकीर्तन, भजन, अभंग आणि सायंकाळी हरिपाठाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. वारकरी दिवसभर नामस्मरण, भजन-कीर्तन आणि भारुडात तल्लीन झाले होते.

ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच तरुणाईनेही मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला. दर्शनानंतर अनेकांनी पालखी परिसरात फेरफटका मारत या सोहळ्याचा आनंद लुटला. पालखी मुक्कामामुळे भवानी पेठ परिसराला जणू भक्तीच्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. विविध धार्मिक साहित्य, पूजासाहित्य आणि पारंपरिक वस्तूंच्या खरेदीलाही प्रतिसाद मिळाला. पालखीसोबत आलेल्या दिंड्यांतील वारकऱ्यांनी शहरातील मंदिरे, मंगल कार्यालये, शाळा तसेच विविध मैदानांमध्ये मुक्काम केला. शहराच्या विविध भागांत दिवसभर अभंग, कीर्तन, प्रवचन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम रंगले होते. आळंदी-देहू ते पुणे आणि पुढे सासवडच्या लांब पल्ल्याच्या पायी प्रवासामुळे अनेक वारकऱ्यांनी दुपारी विश्रांती घेतली, तर सायंकाळी पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देत पर्यटनाचाही आनंद घेतला.

आठ हजार चौरस फूट जागेमुळे भाविकांसाठी दर्शन सुकर

मंदिरालगतच्या काही मिळकती महापालिका तसेच नागरिकांच्या सहकार्याने यंदा आठ हजार चौरस फुटांची जागा उपलब्ध झाली. या विस्तारामुळे मंदिर परिसर अधिक प्रशस्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दर्शनरांगा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि इतर सुविधांचे प्रभावी नियोजन करणे आयोजकांना शक्य झाले होते. दरवर्षी अपुऱ्या जागेमुळे मंदिर तसेच परिसरात मोठी गर्दी होत होती. यंदा मात्र सुटसुटीत जागेमुळे सर्व भाविकांना माउलींच्या पादुकांचे व्यवस्थित दर्शन घेता आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

पुणेकरांचा प्रथेप्रमाणे पाहुणचार

आपल्या दारी आलेल्या वारकर्‍यांचा पुणेकरांनी प्रथेप्रमाणे पाहुणचार केला. स्वादिष्ट भोजनासह वारकर्‍यांना चप्पल, कपडे, पिशव्या शिवून देणे, केस कापणे, पायांना मसाज करण्यापासून त्यांना वारीसाठी फराळाचे पदार्थ, बिस्किटे देण्यात आली. अनेक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळे, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, कंपन्या, व्यापारीवर्गाने वारकर्‍यांसाठी भोजन व निवासव्यवस्था केली होती. वारकर्‍यांसाठी विविध उपक्रम राबवत पुणेकरांनी विठ्ठलचरणी आपली सेवा दिली.

आज पालखी होणार मार्गस्थ

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर शनिवारी सकाळी ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते महाआरती आणि अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर ६ वाजता पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान करणार असल्याची माहिती पालखी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT