

शंकर कवडे
पुणे: आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरावरील प्रत्येक शिल्पाचा आम्ही बारकाईने अभ्यास केला. मंदिराच्या स्थापत्यशैलीतील प्रत्येक तपशील प्रथम रेखाचित्रांत उतरवला. त्यानंतर ई-पॉक्सी पॉलिस्टर रेझीनच्या माध्यमातून त्याला त्रिमितीय स्वरूप दिले.
लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय असल्याने प्रत्येक नक्षी, प्रत्येक शिल्प अत्यंत काळजीपूर्वक घडविले, असे सांगत शिल्पकार विवेक आणि विराज खटावकर यांनी माउलींच्या नव्या पालखी रथाच्या निर्मितीमागील प्रवास उलगडला. श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारा हा रथ यंदाच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला आहे.
राज्यात प्रथमच ई-पॉक्सी पॉलिस्टर रेझीनच्या माध्यमातून सूक्ष्म स्वरूपात पालखीचा रथ तयार केला. खटावकर पिता-पुत्रांनी यंदा माउलींच्या पालखीसाठी वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन साकारले आहे. स्टुडिओत तयार केलेल्या या रथात आळंदी मंदिरावरील मूळ शिल्पांचा अभ्यास करून त्यांचा कलात्मक वापर केला आहे. रथावर गोमुख, गरूड, जय-विजय, चंद्र-सूर्य, पंचमुखी नाग यांसारखी धार्मिक प्रतीके साकारली आहेत.
तुळशीच्या पानांच्या आकारातील रंगीत नक्षीकामामुळे संपूर्ण रथाला देखणा साज चढला आहे. दोन्ही बाजूंच्या पॅनेलवर पालखी सोहळा, घोड्यांचे रिंगण आणि डोक्यावर तुळस घेऊन चालणारे वारकरी यांची जिवंत शिल्पचित्रे कोरली आहेत. त्यामुळे वारकरी परंपरेचे संपूर्ण दर्शनच या रथातून घडते. रथाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथे त्यावर चांदीचे इलेक्ट्रोप्लेटिंग केले. त्यानंतर आळंदीजवळील चिंबळी येथे सर्व भाग एकत्र करून ट्रॉलीवर रथाची उभारणी केली.
माउलींच्या पालखीवर काम करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य आहे. हा केवळ कलाकृतीचा प्रकल्प नव्हता, तर श्रद्धा आणि सेवेचा अनुभव होता. आळंदी मंदिरावरील प्रत्येक शिल्पाचा बारकाईने अभ्यास करून ते पालखीवर साकारण्याचा प्रयत्न केला. लाखो वारकरी या रथाचे दर्शन घेणार असल्याने प्रत्येक तपशील अत्यंत जपून घडवला.
विवेक आणि विराज खटावकर, शिल्पकार