Library Pudhari
पुणे

DMER Librarian Recruitment: डीएमईआरच्या ग्रंथपाल भरतीवरून वाद; पदवी-पदव्युत्तरधारक उमेदवारांना अपात्र ठरवल्याचा आरोप

६७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया; २०१२, २०१४ आणि २०२३च्या भरतीत पात्र ठरलेले उमेदवार यंदा अपात्र कसे? परीक्षार्थींचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

यवत: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) ग्रंथपालपदाच्या तीन प्रवर्गांतील ६७ रिक्त जागांसाठी प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीधारक असलेल्या शेकडो उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला असून, यामुळे उच्च शैक्षणिक पात्रता असूनही उमेदवारांना नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, डीएमईआरकडून सेवा भरती नियम १९८६ चा आधार घेत अर्जदारांकडे ग्रंथालयशास्त्रातील सहा महिन्यांचे प्रमाणपत्र किंवा पदविका असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याच नियमांच्या आधारे झालेल्या मागील भरती प्रक्रियेत पदवी आणि पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना पात्र ठरवून नियुक्त्या देण्यात आल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे.

विशेष म्हणजे, २०२३ च्या डीएमईआर भरती प्रक्रियेत पात्र ठरलेला उमेदवार पुढील भरती प्रक्रियेत त्याच शैक्षणिक पात्रतेसह अपात्र ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. उमेदवारांच्या मते, शैक्षणिक पात्रता समान असताना दोन भरती प्रक्रियांमध्ये पात्रतेचे वेगवेगळे निकष लावणे हा गंभीर विरोधाभास आहे.

मागील भरतीचा दाखला

२०१२, २०१४ आणि २०२३ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत ग्रंथालय व माहितीशास्त्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते, असा दावा परीक्षार्थींनी केला आहे. त्यामुळे नियमांमध्ये कोणताही बदल झाला नसताना या वेळी त्याच शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना अपात्र ठरविण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या परीक्षेत आम्ही जास्त शिकलो म्हणून आमच्यावर अन्याय केला जात असून, हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. समान शैक्षणिक पात्रता असताना मागील भरतीत पात्र ठरवून या वेळी अपात्र ठरविण्याचे कारण स्पष्ट झाले पाहिजे.
शीतल वणवे, परीक्षार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT