पुणे: दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला लक्षात घेता, पुणे विभागातून राज्यभरातील विविध शहरांसाठी सुमारे १२०० अतिरिक्त व नियमित गाड्या सोडण्यात येणार आहेत. एसटीच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, दिवाळी सणानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक आपल्या गावी परततात. प्रवाशांची हीच गर्दी लक्षात घेऊन मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी या विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. नियमित फेऱ्याव्यतिरिक्त गर्दीनुसार तत्काळ गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी पुणे विभागाने तयारी केली आहे.
स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि पिंपरी-चिंचवड या प्रमुख बसस्थानकांसह विभागातील अन्य आगारांमधून या गाड्या सोडण्यात येणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी हे ज्यादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी ऐनवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा एसटी आरक्षण केंद्रांवरून आपल्या प्रवासाचे आगाऊ बुकिंग करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी जाताय?
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेल्वेच्या पुणे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-नागपूर-पुणे यादरम्यान धावणाऱ्या अनारक्षित विशेष गाडीच्या फेऱ्यांच्या तारखा व वेळापत्रकात बदल केला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ही विशेष गाडी सोडण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रक आणि फेऱ्यांची माहिती
गाडी क्र.०१२१५ (पुणे-नागपूर विशेष) : ही गाडी आज दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी नागपूर येथे पोहचेल. या गाडीची एक फेरी चालवली जाईल.
गाडी क्र.०१२१६ (नागपूर-पुणे विशेष) : ही गाडी दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पुणे येथे पोहचेल. या गाडीचीही एक फेरी असणार आहे.
डब्यांची रचना आणि थांबे
या विशेष गाडीला एकूण १८ आयसीएफ डबे असतील. यात सामान्य द्वितीय श्रेणी आणि शयनयान श्रेणीचे १६ डबे पूर्णपणे अनारक्षित स्वरूपात असतील, तर २ गार्ड/लगेज व्हॅन जोडण्यात येतील. दोन्ही दिशांच्या प्रवासात ही गाडी दौंड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अनकाई (पासिंग हॉल्ट), मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी या स्थानकांवर थांबेल.
तिकीट बुकिंगची सुविधा
सर्व डबे अनारक्षित असल्याने प्रवाशांना यूटीएस प्रणाली, रेल्वेस्थानकावरील तिकीट बुकिंग काउंटरवरून सहज अनारक्षित तिकिटे काढता येतील. या गाड्यांसाठी मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमित भाडे आकारले जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते. प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षित बस मिळाव्यात, यासाठी पुणे विभागातून सुमारे १२०० गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग