पुणे : देवी-देवतांची आणि महापुरुषांची छायाचित्रे असलेले आकाशकंदील, फुलांपासून ते दिव्यांपर्यंत वेगवेगळ्या डिझाइनमधील कंदील, फोटोफेम आकाशकंदील आणि जय हनुमान, जय श्री राम, जय गणेश, असे विविध जयघोष लिहिलेले कंदील, अशा वैविध्यपूर्ण आणि कलात्मक आकाशकंदिलांनी बाजार पेठा उजळल्या आहेत.(Latest Pune News)
यंदा दिवाळीसाठी फोटोफेम प्रकारातील आकाशकंदिलांचा ट्रेंड असून, या प्रकारातील आकाशकंदिलांना पुणेकरांकडून मागणी आहे. फुले, मोरपंख, दिवे-पणत्या या डिझाइनमधील कंदिलांचीही मागणी होत असून, खास वारली पेंटिंग असलेल्या कंदिलांचीही चलती आहे. वूडन शीट, कागदी, कापडी प्रकारातील पर्यावरणपूरक कंदिलांना मागणी वाढली असून, घराच्या सजावटीच्या छोट्या रंगबिरंगी कंदिलांचीही खरेदी होत आहे.
दिवाळी सण जवळ आला आहे. आपले घर दिवे-पणत्यांसह आकाशकंदिलांच्या प्रकाशाने उजळावे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. आकाशकंदील हा दिवाळीच्या सणातील महत्त्वाचा भाग असून, दरवर्षी नावीन्यपूर्ण प्रकारचे कंदील खरेदी करण्यावर भर दिला जातो. यंदाही वेगवेगळ्या प्रकारच्या कंदिलांनी बाजारपेठा सजल्या असून, कंदिलांच्या लख्ख प्रकाशाने कंदील विक्रीचे स्टॉल, दालने उजळली आहेत. रविवार पेठेतील बोहरी आळी, मंडई, कोथरूड, नदीपात्रातील स्टॉल्स, शनिवारवाड्या-जवळील स्टॉल्स, कॅम्प, डेक्कन, खडकी आदी ठिकाणी कंदिलांची विक्री होत आहे. येथे कंदील खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पारंपरिक कंदिलांच्या जोडीला नवीन प्रकारातील कंदील बाजारात आहेत. त्यात वूडन शीट, कागदी, कापडी आणि बांबूने तयार केलेल्या कंदिलांना पसंती मिळत आहे.
‘जाणता राजा’ लिहिलेले कंदील, ज्यूट प्रकारातील कंदील असो वा दिवे-पणत्या, स्टार, बासरी असे विविध प्रकारचे कंदील लक्ष वेधून घेत आहेत. फोल्डिंग आकाशकंदील, फोटोफेम असलेल्या कंदिलांना सर्वाधिक मागणी आहे. फोटोफेम आकाशकंदिलांमध्ये भगवान शंकर, देवी लक्ष्मी, श्री गणेश, प्रभू श्री राम, श्री हनुमान, श्री विठ्ठल अशा विविध देवी-देवतांची तसेच महापुरुषांची छायाचित्रे असल्याने अन् त्यात एलईडी दिवे लावलेले असल्याने या कंदिलांना पुणेकरांकडून मागणी होत आहे. प्लास्टिकच्या कंदिलांना यंदा फारशी मागणी नसून, छोटे कंदील, रंगबिरंगी कागदांनी तयार केलेले कंदील पाहायला मिळत आहेत.
व्यावसायिक विद्या गणेश सावंत म्हणाल्या की, आम्ही वर्षभरापासून आकाशकंदील तयार करीत होतो, आम्ही जवळपास 10 ते 12 हजार कंदील तयार केले आहेत आणि हे कंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आमच्याकडे वूडन शीटने तयार केलेले कंदिलांचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. तर, पारंपरिक कापडी कंदिलांमध्येही वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. विविध जयघोष लिहिलेल्या कंदिलांपासून ते ज्यूट प्रकारातील कंदील, वारली पेटिंग ते फोटोफेमपर्यंतचे असे असंख्य प्रकार खरेदीसाठी उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक कंदिलांच्या खरेदीवर पुणेकर भर देत असून, छोट्या आकारातील कंदिलांपासून ते पाच फुटांपर्यंत कंदीलही आमच्याकडे आहेत.
वैविध्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक आकाशकंदिलांच्या खरेदीसाठी पुणेकर गर्दी करीत आहेत.