पुणे: कमळावर विराजमान झालेली लक्ष्मी, एका हाताने आशीर्वाद तर दुसऱ्या हाताने धनवर्षाव करणारी धनलक्ष्मी... आकर्षक साडी, नाजूक दागिने आणि सुबक रंगसंगतीने सजलेल्या लक्ष्मीच्या विविध रूपांनी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक मूर्तींबरोबरच दाक्षिणात्य शैलीतील मूर्तीही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आठ इंचांपासून दीड फुटापर्यंतच्या मूर्ती बाजारात उपलब्ध असून, त्यांची ५०० ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. अश्विन अमावास्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. आनंदाची उधळण करणाऱ्या दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. लक्ष्मीपूजनावेळी आसनस्थ झालेली तसेच धनवर्षाव होत असलेली मूर्ती अथवा प्रतिमा पूजेसाठी प्राधान्याने घ्यावी, असे सांगितले जाते. पूर्वी लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याकडे नागरिकांचा कल होता.
मात्र, गेल्या काही वर्षांत आकर्षक मूर्तींच्या पूजनाला पसंती मिळू लागली आहे. त्यानुसार मूर्तिकारांनीही पारंपरिक मूर्तींना आधुनिक सजावटीची जोड देत विविध आकार आणि रूपांतील मूर्ती तयार केल्या आहेत. शहरातील महात्मा फुले मंडई परिसर, कुंभारवाडा आणि उपनगरांतील बाजारपेठांमध्ये लक्ष्मीच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. कमळारूढ, धनवर्षाव करणाऱ्या तसेच विविध आसनांमध्ये विराजमान झालेल्या मूर्तींना पसंती मिळत आहे.
काही मूर्तींना आकर्षक मुकुट, केसांचे गंगावन, कानातले, नथ, बिंदी आणि जरीकाम केलेल्या साड्यांनी सजवले आहे. सजावटीतील बारकावे आणि आकर्षक रंगकामामुळे या मूर्ती अधिक उठावदार दिसत आहेत. विशेष सजावट केलेल्या मूर्तींचे दर तुलनेने अधिक असले, तरी त्यांना चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
पूर्वी लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याची पद्धत अधिक प्रचलित होती. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांत मूर्तीपूजनाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दिवाळीबरोबरच मार्गशीर्षातील गुरुवारच्या पूजेसाठीही मूर्तींचा वापर होत असल्याने सुबक आणि आकर्षक मूर्तींना चांगली मागणी आहे.गणेश कुंभार, जय गणेश आर्टस्, लोहगाव