Diwali Faral Pudhari
पुणे

Diwali Faral Price Hike: भाववाढीमुळे दिवाळीचा फराळ यंदा खिशाला जड! फराळ साहित्याचे बजेट २० ते ३० टक्क्यांनी वाढले

साखर, गूळ, बेसनासह डाळींच्या दरात मोठी वाढ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिवाळीचा फराळ गोड करायचा, तर खिशाला मात्र महागाईचा चटका सहन करावा लागणार आहे. चकली, चिवडा, लाडू, करंजीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरांनी यंदा चांगलीच उसळी घेतली आहे.

गूळ, बेसन, साखर, डाळींसह खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने घरगुती फराळाचे गणित बिघडले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बहुतांश साहित्य १५ ते ३० टक्क्यांनी महागले असून, काही वस्तूंच्या दरवाढीने ३० टक्क्यांचाही टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे दिवाळीचा गोडवा कायम राखताना सर्वसामान्यांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील किरकोळ बाजारपेठांमध्ये फराळाच्या साहित्याच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अपुरा पाऊस आणि खरीप पिकांच्या उत्पादनातील घट, यांचा परिणाम काही वस्तूंच्या आवकेवर आणि दरांवर झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच दिवाळीनिमित्त फराळाच्या साहित्याला मागणी वाढत असल्याने ग्राहकांच्या बजेटवर ताण येत आहे.

वाढत्या खर्चाला आवर घालण्यासाठी काही ग्राहक मोजकेच पदार्थ करण्यास प्राधान्य देत आहेत, तर काही जण साहित्याची खरेदी टप्प्याटप्प्याने करीत आहेत. पारंपरिक फराळाची हौस आणि घरखर्चाची मर्यादा यांचा मेळ घालतच यंदा दिवाळीची तयारी करावी लागत असल्याचे चित्र बाजारात होत असल्याच्या मागणीवरून दिसत असल्याचे निरीक्षण व्यापारीवर्गाकडून नोंदविण्यात आले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत फराळासाठी लागणाऱ्या बहुतांश साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. विशेषतः गूळ, बेसन, हरभरा डाळ आणि फुटाणा डाळीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पोह्यांच्या दरांतही वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीइतक्याच प्रमाणात फराळ तयार करण्यासाठी यंदा अधिक खर्च करावा लागणार आहे. दरवाढीमुळे ग्राहकांकडून आवश्यकतेनुसार साहित्य खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे.
- राजेश शहा, तांदूळ व अन्नधान्य घाऊक व्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT