शहरातील इच्छुकांची जोरदार तयारी Pudhari
पुणे

Diwali faral distribution Pune civic elections: दिवाळी फराळ अन्‌‍ भेटवस्तूंमधून मतांची पेरणी!

फराळाच्या गोडीने मतदारांचा बदलणार कल?; शहरातील इच्छुकांची जोरदार तयारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महापालिका निवडणुकांसाठीची अंतिम प्रभागरचना जाहीर होताच चार वर्षांच्या प्रशासकराजनंतर पुणे पालिका निवडणुकांची चाहूल लागली आहे. विविध पक्षातील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला असून, मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रकाशाचा उत्सव असलेला दिवाळीचा सण अवघ्या दहा दिवसांवर आल्याने पणती, उटणे, साबणापासून फराळांचे साहित्य वाटप करून मतदारापर्यंत पोहचत आपली ‌‘गोड छाप‌’ उमटवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.(Latest Pune News)

प्रकाशाचा उत्सव असलेला दिवाळीचा सण हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण. सणाच्या निमित्ताने घराघरात आनंदाचे वातावरण असतेच. मात्र, यंदा या आनंदात राजकीय रंग मिसळला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध ‌‘फराळ योजना‌’ आकार घेऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी फराळाचा संरजाम तर काही ठिकाणी चिवडा, लाडू, शंकरपाळी, शेव आदी खाद्यपदार्थ पॅकिंग होऊ लागले आहेत.

तर, काही इच्छुकांनी पणत्या, उटणे, अत्तर, अगरबत्त्यांचे ‌‘गिफ्ट पॅक‌’ मतदारांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. दिवाळी फराळ तसेच साहित्याच्या वाटपाचे उपक्रम राबवित त्याआडून मतदारांशी ‌’नातं घट्ट‌’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सद्यःस्थितीत अंतिम प्रभागरचना जाहीर झाली आहे. निवडणुकांसाठीचे आरक्षण जाहीर होणे अद्याप बाकी आहे, त्यात निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नसला, तरी इच्छुकांच्या हालचालींवरून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक प्रभागांमध्ये पोस्टर, बॅनर, शुभेच्छापत्रे, सोशल मीडियावरील प्रचार अशा सर्व माध्यमांतून आपण निवडणुकांसाठी इच्छुक असल्याचे मतदारांसह पक्षातील वरिष्ठांना संदेश देत असल्याचे चित्र आहे.

गोरगरिबांची दिवाळी गोड होणार

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फराळाचे आणि भेटवस्तूंचे वाटप सुरू होणार असल्याने गरीब, कष्टकरी नागरिकांचीही यंदा दिवाळी गोड होणार आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महिलांना फराळ साहित्य तयार करण्याचे काम देण्यात आले असून, त्यामुळे त्यांनाही थोडा रोजगार मिळत आहे. याखेरीज, दिवाळीचा सरंजाम तसेच उपयोगी भेटवस्तूंमुळे दरवर्षी त्यावर होणारा खर्च अन्य साहित्यांवर करता येणार असल्याने गोरगरीबांमध्ये आनंदाचे वातावरण तयार असल्याचे चित्र आहे. चार वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकही खूप असून, कोण काय भेट देणार, तसेच कोण काय पॅकेटस् तयार करतोय, यावर प्रभागात चर्चा रंगत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT