पुणे : दिवाळीतील महत्त्वाचा भाग म्हणजे सणासाठीची सजावट... दरवर्षी वेगवेगळ्या थीमनुसार घरोघरी सजावट केली जाते... यंदाही हीच परंपरा जपत घराघरांमध्ये थीमनुसार सजावट करण्यात येत आहे. कोणी दिवे-पणत्यांच्या थीमप्रमाणे तर कोणी फुलांच्या थीमनुसार... कोणी मल्टिकल्चर थीमप्रमाणे सजावट करणार आहेत, तर कोणी विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. याप्रमाणेच पुणेकर बाजारेपठांमध्ये जाऊन सजावटीच्या साहित्यांची खरेदी करत आहेत.(Latest Pune News)
जास्वंद, झेंडू, मोगरा, गुलाबाच्या आर्टिफिशिअल फुलांच्या माळा... दिव्यांच्या प्रकारातील लटकन... रंगबिरंगी पडदे... मोत्यांचे, फुलांचे तोरण, कलरफुल दिवे आणि शुभ दीपावली, हॅपी दिवाली लिहिलेले स्टिकर्स अशा सजावटीच्या साहित्य बाजारपेठ सजली आहे. आर्टिफिशिअल फुले, फुलदाणी, तोरण, पडदे, एलईडी दिवे, झिरमिळ्या, कलरफुल कागद... असे साहित्य लक्ष वेधून घेत आहे. कलरफुल लाइट्स, छत्री, छोटे कंदील, कागदाने तयार केलेले डेकोरेटिव्ह दिवे, रांगोळी स्टिकर्स... अशा विविध साहित्याची खरेदीही केली जात आहे.
दिवाळीमध्ये घरोघरी खास सजावटीवर भर देण्यात येते. दिवाळीचे पर्व खास पद्धतीने साजरे करावे, यासाठी गेल्या काही वर्षांत थीमप्रमाणे सजावट करण्याचा ट्रेंड वाढला आहे. यंदाही कलरफुल, लाईटिंग, फुलांची थीम आणि काल्पनिक मंदिरांच्या प्रतिकृतीच्या थीमनुसार साहित्याची खरेदी करण्यात येत आहे. सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी रविवार पेठेतील बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, कॅम्प परिसर आदी ठिकाणी लगबग पाहायला मिळत आहे.
खासकरून संस्थांकडून आणि कंपन्यांकडूनही सजावटीच्या साहित्यांना मागणी होत असून, झिरमिळ्या, फुलांच्या माळा, तोरण, दिवे, हेही खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यात पर्यावरणपूरक सजावटीचे साहित्यही आहे. कागदाची फुले, मल्टिकलर वॉल हँगिगसह झेंडू, जास्वंद, मोगरा, गुलाब आदी फुलांच्या माळा, फुलदाण्या, राजस्थानी लटकन, रंगबिरंगी पडदे आदी साहित्यही खरेदी केले जात आहेत. शोपीस, वॉल हँगिंग दिवे, लॅम्प, मोत्यांच्या माळा, फॅन्सी छत्री... असे साहित्यही लक्षवेधी ठरत आहेत. साहित्यांच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
साहित्य खरेदीसाठी आलेल्या अर्चना देशपांडे म्हणाल्या, दरवर्षीप्रमाणे यंदाही सजवाटीच्या साहित्यांमध्ये नानाविध प्रकार आले आहेत. तोरणपासून ते रंगबिरंगी दिव्यांपर्यंत... असे विविध साहित्य खरेदी केले आहेत. थीमप्रमाणे साहित्याची खरेदी केली आहे.