पुणे : पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 2 लाख 2 हजार 263 हेक्टर इतके आहे, तर प्रत्यक्षात 2 लाख 10 हजार 301 हेक्टरवर म्हणजेच सरासरीच्या 104 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक पेरण्यांमध्ये प्रामुख्याने उडीद 151 टक्के, मका 144 टक्के, तर सोयाबीन आणि तुरीचा पेरा प्रत्येकी 109 टक्क्यांइतका झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
यंदाच्या खरीप हंगामातील पुणे जिल्ह्यातील पीक पेरण्यांचा अहवाल नुकताच अंतिम झाला असून, त्यामध्ये हे चित्र स्पष्ट झाले आहे. पिकांच्या पेरण्यांखालील क्षेत्रवाढीमुळे खरीप उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र, कीड व रोगांमुळे विक्रमी धान्योत्पादनाऐवजी किमान सरासरी उत्पादन हाती येईल, असेही ते म्हणाले. (Latest Pune News)
चालू वर्षी मे महिन्यापासूनच सुरू झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांसाठी पोषक स्थिती हंगामाच्या सुरुवातीसच निर्माण झालेली होती. वास्तविक, उन्हाळी हंगामातील पिकांचे नुकसान लवकर सुरू झालेल्या पावसाने निश्चित झाले.
मात्र, खरिपातील पेरण्यांसाठी हा पाऊस फलदायी राहिलेला आहे. कारण, पावसामुळे जमिनीतील ओलावा, ओढ्या-नाल्यांद्वारे पाण्याची उपलब्धता आणि कमी-जास्त पावसाच्या सरींवर शेतकऱ्यांना बहुतांश पिकांच्या पेरण्या करण्यास मिळालेल्या अवधीमुळे पिकांखालील सरासरी क्षेत्र ओलांडण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
जादा पावसामुळे अथवा पेरण्यांसाठी जमिनीत पुरेसा वाफसा न मिळाल्याने काही खरीप पिकांच्या पेरण्यांचा कालावधी संपून गेला. त्यामुळे सरासरी क्षेत्राइतक्या काही पिकांच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. जिल्ह्यात खरीप हंगामातील मुगाचे 10 हजार 627 हेक्टर इतके क्षेत्र आहे. तर, सर्वाधिक मुगाची पेरणी ही पूर्व भागातील शिरूर तालुक्यामध्ये 7 हजार 715 हेक्टरवर पूर्ण झाली. तुलनेने अन्य तालुक्यांत मुगाच्या पेरणीखालील क्षेत्र कमी दिसून आले.