पौडरोड: पौड रोड परिसरातील मुख्य रस्त्यांवर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिक अंतर्गत रस्त्यांचा वापर करीत आहेत. परंतु या रस्त्यांवरील चेंबरची झाकणे वारंवार तुटत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. किनारा हॉटेल ते साम्राज्य पेटकर मार्गावरील शिक्षकनगर परिसरातील चेंबरच्या झाकणांची सध्या दुरवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिक्षकनगर चौक परिसरातील दुरवस्था झालेल्या चेंबरचे झाकण सात-आठ दिवसांपूर्वी बदलण्यात आले होते. मात्र हे झाकण पुन्हा तुटले आहे. तसेच आणखी तीन झाकणे देखील तुटल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने या चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Latest Pune News)
परिसरात अनेक लहान-मोठ्या सोसायट्यांचा पुनर्विकास केला जात आहे. यामुळे रस्त्यांवर बांधकाम साहित्याची वाहतूक करणार्या अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक केली जात असल्याने रस्त्यावर खड्डे पडतात, तसेच चेंबरची वारंवार दुरवस्था होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दुरवस्था झालेल्या चेंबरमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पादचार्यांना रस्त्यांवरून चालणे अवघड झाले आहे. तसेच अपघात होण्याचा धोकाही नाकारता येत नाही.
पौडरोड परिसरातील अंतर्गत रस्त्यांचा वापर फक्त दुचाकी आणि कमी क्षमतेच्या चारचाकी वाहनाकडून होणे अपेक्षित आहे. परंतु या भागात मोठी बांधकामे सुरू असल्याने अवजड वाहनांची या रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. यामुळे चेंबरची झाकणे वारंवार तुटत आहेत.- सचिन जोरी, रहिवासी, पौड रोड