पुणे: विकेंडचा आणि पडणार्या पावसाचा पर्यटनस्थळी जाऊन आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेले पुणे-सातारा रस्त्यावर ठिकठिकाणी कोंडीने जाम झाल्याचे चित्र शनिवारी (दि. 24) पाहायला मिळाले. पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेसह पुणे शहर हद्दीतील वाकड, बाणेर आणि वडगाव, नवले पूल येथील मुख्य महामार्ग रस्त्यावर आणि येथील सेवा रस्त्यांवरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यातून मार्ग काढताना वाहनचालकांच्या नाकी नऊ आले.
शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आणि शहरातील तसेच शहराजवळून जाणार्या प्रमुख महामार्गांवर तब्बल 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Latest Pune News)
नवीन बोगदा ते चांदणी चौकापर्यंत शनिवारी वाहनांची अक्षरशः कोंडी झाली होती. याशिवाय वाकड आणि बाणेर भागातील महामार्गांवरही वाहतुकीची मंद गती दिसून आली. यामुळे वाहनचालक चांगलेच वैतागले होते. वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आणि अनेकांना नियोजित वेळेत पोहचणे शक्य झाले नाही.
या उपाययोजना कराव्यात...
वाहतूक व्यवस्थापन सुधारावे
विकेंड आणि सुट्ट्यांमध्ये अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी
महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि जंक्शनवर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. अडचणीच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गांची उपलब्धता करावी. महामार्गांची क्षमता वाढविणे.
अडथळा ठरणार्या ठिकाणी रस्तारुंदीकरण किंवा उड्डाणपूल (फ्लायओव्हर) बांधणे. सर्व्हिस रोडची दुरुस्ती आणि त्यांचा योग्य वापर सुनिश्चित करणे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन द्यावे.
सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि आरामदायी बनवणे, जेणेकरून खासगी वाहनांचा वापर कमी होईल. पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहनांच्या संख्येचा विचार करून वाहतूक आराखड्यात सुधारणा करावी. नवीन रिंगरोड किंवा बायपास मार्गांचे काम वेगाने पूर्ण करावे.
पावसाळ्यापूर्वी गटारे साफ करणे, ज्यामुळे रस्त्यावर पाणी साचणार नाही. खड्डे बुजवण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे.
वाहनचालकांनी काय काळजी घ्यावी?
प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची सद्य:स्थिती गुगल मॅपद्वारे तपासून घ्यावी
शक्य असल्यास गर्दीच्या वेळी प्रवास टाळावा. विकेंडचे पर्यटन जमल्यास टाळावे. विकेंडला घराजवळच्या पर्यटनस्थळी जावे.
लांबच्या पर्यटनाला जायचे असेल, तर विकेंडच्या एक दिवस अगोदरच घरातून निघावे. वाहतूक कोंडी झालेली दिसल्यास, टोल फ—ी क्रमांकाद्वारे वाहतूक नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्यावी. वाहतूक कोंडीत अडकल्यास घाईगडबड करू नये.
वडगाव-धायरी पुलावर प्रचंड कोंडी; सर्व्हिस रस्त्यांचा श्वास कोंडला...
शहराजवळून जाणार्या महामार्गांवर, विशेषतः मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण होता. वडगाव -धायरी पुलावरही प्रचंड गर्दी झाल्याने येथील सर्व्हिस रस्त्यांचा अक्षरशः श्वास कोंडला होता. अनेक वाहनचालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईच्या दिशेने सातार्याकडे जाणार्या महामार्गावर आणि सातार्याकडून मुंबई दिशेने येणार्या मार्गावरही कोंडी झाल्याने दोन्ही बाजूंनी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. विकेंडला घराबाहेर पडावे की नाही? असा प्रश्नच आता वाहनचालकांना पडू लागला आहे. पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
मी सकाळी 10 वाजता घराबाहेर पडलो, पण मुंबईच्या दिशेने सातार्याकडे जाताना वारजे रस्त्यावरून नवीन बोगद्याकडे जायलाच दीड ते दोन तास लागले. दोन्ही दिशेच्या रस्त्यावर सारखीच स्थिती होती. विकेंडला कुटुंबीयांसोबत बाहेर जाण्याचा बेत केला होता, पण हा प्रवासच एवढा त्रासदायक ठरला. दर विकेंडला हीच परिस्थिती असते. प्रशासनाने यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा, नाहीतर पुढच्या वेळी विकेंडला बाहेर पडण्याआधी आम्हाला दहावेळा विचार करावा लागेल.
- दिनेश शिंदे, किवळे येथील वाहनचालक
पुणे-मुंबई महामार्गावर विकेंडमुळे झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच चांदणी चौक, वाकड, बाणेर, वडगाव, नवले पूल आणि नवीन बोगदा ही शहर हद्द आहे. ती आमच्याकडे नाही.
- विक्रांत देशमुख, महामार्ग पोलिस अधीक्षक, पुणे विभाग