बारामती: आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती नगरपरिषदेची प्रभागरचना करताना त्यात कोणावरही अन्याय होऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीय प्रतिनिधींकडून (राष्ट्रवादी अजित पवार गट) ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्याकडे करण्यात आली.
रविवारी (दि. 8) यासंबंधी गोविंदबागेत पवार यांची भेट घेण्यात आली. प्रभागरचनेत लोकसंख्या व भौगोलिक स्थितीच्या निकषांचे पालन केले जात नाही; परिणामी दलित, अल्पसंख्याक व वंचित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम झाल्याचे खा. पवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (Latest Pune News)
निवेदनात असेही म्हटले आहे की, शहरातील काही भागांमध्ये एकाच समाजाचे एकत्रित प्रभाग तयार करून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. काही भागांमध्ये प्रभागरचनेचे कोणतेही संकेत न पाळता मनमानी पद्धतीने विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे समाजाच्या न्याय्य प्रतिनिधित्वास बाधा निर्माण झाली आहे. हे सर्वपक्षीय पदाधिकारी विविध राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
शिष्टमंडळाने खा. शरद पवार यांना विनंती केली की, त्यांनी स्वतः या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निवडणूक आयोगाशी चर्चा करून नव्याने व न्याय्य पद्धतीने प्रभागरचना करावी; जेणेकरून वंचित समाजाचा आवाज दबला जाणार नाही. दरम्यान, खा. पवार यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत आवश्यक तेथे प्रशासनाशी बोलू, असे सांगितले.