पुणे: ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’तील विश्वस्त मंडळात सुरू असलेले शीतयुद्ध आता चांगले भडकले आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता होणारी बैठक चक्क दुपारी 3.30 वाजता सुरू झाली. मात्र, बैठकीच्या अजेंड्यात ऐनवेळी बदल करण्यात आला. दरम्यान ‘संस्थेचे विश्वस्त मंडळच बरखास्त करा’ अशी मागणी करणारी तक्रार एका व्यक्तीने धर्मादाय न्यायालयात दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या अथक प्रयत्नांतून देशभरात उभारलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’मधून अपात्र विश्वस्ताचा समावेश असलेले मंडळच बरखास्त करा, अशी मागणी करणारी याचिका नुकतीच धर्मादाय न्यायालयात दाखल झाली. (Latest Pune News)
कारण संस्थेत गेल्या तीन वर्षांमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. याबाबत दै. ‘पुढारी’ने सातत्याने पाठपुरावा करत संस्थेतील अनेक घोटाळे उघडकीस आणले. त्याचा परिणाम म्हणून तत्कालीन सचिव मिलिंद देशमुख याचे पदही संस्थेला काढून घ्यावे लागले. तत्कालीन कुलगुरू डॉ. अजित रानडे यांना ही राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली.
आता दि. 6 जूनपासून संस्थेच्या वार्षिक सत्रासाठी समस्त विश्वस्त मंडळ पुणे मुक्कामी आले. मात्र देशमुख यांच्या गोंधळापासून वाचण्यासाठी अध्यक्षांनी आजारीपणाचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे, तर ज्येष्ठ सदस्य पी. के. द्विवेदी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जोशी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. दरम्यान असा सर्व गोंधळ सुरू असतानाचा कुलगुरू हटावच्या घोषणा देत सोमवारी युवक काँग्रेसकडून प्रभारी कुलगुरूंच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
विश्वस्त मंडळाने घेतली धास्ती
या पूर्वी संस्थेच्या विरोधात मिलिंद देशमुख यांच्या कारनाम्यांमुळे विविध तक्रारी पोलिस ठाणे, धर्मादाय न्यायालय ते उच्च न्यायालयापर्यंत याचिका पोहोचल्याने विश्वस्त मंडळाने धास्तावले आहे. त्यात पुन्हा नव्याने दाखल झालेल्या या तक्रारीने प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे.
अध्यक्ष साहू आणि ज्येष्ठ सदस्य द्विवेदी आजारी
संस्थेचे अध्यक्ष दामोदर साहू यांचे वय 84 वर्षे आहे. त्यांनी देशमुखांची पाठराखण केल्याने समस्त संचालक मंडळ अस्वस्थ आहे. अध्यक्षांनीच ठरवलेल्या अजेंड्यानुसार सत्र सुरूअसण्याच्या अपेक्षेने संचालक मंडळ तयार होते. मात्र दस्तुरखुद्द अध्यक्षच आजारी त्यात ज्येष्ठ सदस्य पी. के. द्विवेदी आजारी पडले. त्यामुळे संचालक मंडळ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आहे.
अजूनही मानधनापासून वंचित
आजीवन सदस्य प्रवीणकुमार राऊत यांनी अध्यक्षांना स्थगित असलेले मानधन आणि बदल अर्ज धर्मादाय न्यायालयात नोंदविण्याची मागणी सतत केली. पुन्हा 17 मे रोजी त्याबाबत स्मरणपत्र दिले. जूनच्या वार्षिक सत्रात अजेंड्यावर तो विषय ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर काहीही कार्यवाही झाली न झाल्याने सोमवारी पुन्हा राऊत यांनी नवे स्मरणपत्र दिले आहे.
युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे कुलगुरूंविरोधात आंदोलन
पुणे युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी प्रभारी कुलगुरू प्रा. शंकर दास यांना हटवा, अशी मागणी करणारे आंदोलन संस्थेच्या आवारात केले. यात त्यांनी प्रभारी कुलगुरू दास यांना पदावरून हटविण्याची मागणी करणारे निवेदन संस्थेला दिले. त्या वेळी संस्थेच्या वतीने हा विषय आधीच अजेंड्यावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
देशमुखला सचिवपदावरून बडतर्फ केल्याची नोंद नाही
11 एप्रिल रोजी मिलिंद देशमुख याला सचिवपदावरून बडतर्फ करून ते अधिकार अध्यक्ष साहू यांनी स्वतःकडे ठेवला. मात्र, त्याची नोंद बदल अर्जाद्वारे धर्मादाय न्यायालयात केली गेली नाही. त्यामुळे देशमुख अजूनही सचिव असल्याच्या आविर्भावातच संचालक मंडळावर दादागिरी करीत आहेत. न्यायालयाकडून त्यांना अटी आणि शर्थीवर जामीन मिळाल्याचा विसर देशमुख यांना पडला असल्याचे संचालक मंडळाला दिसून आले. मात्र, अध्यक्ष साहू यांना देशमुखांच्याच इशार्यावर सत्र चालावे, या प्रयत्नात आहेत.
धर्मादाय न्यायालयात कलम ‘41 ड’ नव्याने दाखल
धर्मादाय न्यायालयात एका संस्थेबाहेरील व्यक्तीने 28 मे रोजी विश्वस्त मंडळ बरखास्त करा (कलम 41 ड) अशी मागणी करणारा तक्रार अर्ज दाखल केला. त्याची सुनावणी 11 जून रोजी होणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज शाखेची जमीन बेकायदेशीर विक्री केल्याबाबतचा तक्रार अर्ज (कलम 41 ड) आजीवन सदस्य प्रवीणकुमार राऊत यांनी दाखल केला आहे.