

नारायणगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जुन्नर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी हालचाल सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कार्यकर्त्यांची स्वतंत्रपणे लढण्याची मागणी वरिष्ठांकडे जोरदारपणे होत आहेत. याबाबत वरिष्ठ काय निर्णय घेतात? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
राज्यात सरकार असले, तरी महायुतीच्या घटकपक्षांचे स्थानिक नेते व कार्यकर्ते जुन्नर नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा माजी आमदार अतुल बेनके यांचच्या निवासस्थानी मागील आठवड्यात झाला. कार्यकर्त्यांचे मनोगत या वेळी स्थानिक नेत्यांनी जाणून घेतले. (Latest Pune News)
या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते. त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी निवडणुका महायुती म्हणून लढायला नको. स्वतंत्रपणे लढल्यास संघटना मजबूत होऊन निवडणुकीत पक्षाला यश येईल, असे मत मांडले.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा ओझर येथे पार पडला. या वेळी कार्यकर्त्यांशी हितगुज साधण्यात आला. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांना सांगून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे कंद यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी (दि. 9) आ. शरद सोनवणे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये संघटना बांधण्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सचिन वामन यांनी सांगितले. या बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व जुन्नर नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात देखील कार्यकर्त्यांचा कानोसा घेण्यात आला.
जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ जागा राहणार असल्याची चर्चा होत असून, सहा जागेवर महिलांचे आरक्षण असणार आहे. अवघ्या दोन जागाच पुरुषांसाठी उपलब्ध होणार असल्याने महिलाराज पाहायला मिळणार आहे. सर्वच राजकीय पक्षांना महिला उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे.
दरम्यान, शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत हे 15 दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यात येऊन गेले. महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या की पक्ष म्हणून वेगळी निवडणूक लढवायची, याबाबत महाविकास आघाडीत कोणताही निर्णय झालेला नाही; तथापि शिवसैनिकांनो कामाला लागा, असा आदेश खासदार राऊत यांनी शिवसैनिकांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठी मरगळ असून, निवडणुकीबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार असल्याच्या वावड्यांमुळे कार्यकर्ते द्विधा मन:स्थितीत आहेत.