पुणे

पुणे : कारवाईसंदर्भात चर्चा करून निर्णय घेऊ : पालिका आयुक्त

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसब्यातील वादग्रस्त जागेवर मशीद बांधण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर वारंवार संबंधितांना व पोलिस प्रशासनाला बांधकाम थांबविण्याच्या नोटीस दिल्या आहेत. त्यानंतरही येथे काम झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भात पोलिस व इतर विभागांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

कसब्यातील वादग्रस्त जागेवरील बांधकामावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निमाण समितीच्या वतीने सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. तसेच भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेवून निवेदन दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, येथील जागेवर बांधकाम करण्यासाठी 2007 मध्ये प्रस्ताव आला होता. त्यानंतर 2012 मध्ये राज्याच्या गृहखात्याची मान्यता मिळाल्याने महापालिकेने बांधकामाच्या प्रस्तावस मंजुरी दिली. नंदकुमार एकबोटे यांनी मे 2018 मध्ये या जागेवर अनधिकृत बांधकाम होत असल्याची तक्रार केली.

त्यानंतर महापालिकेने लगेचच ट्रस्टींकडून खुलासा मागवला तसेच मार्च 2019 मध्ये काम थांबवण्याचे आदेश दिले. पुरातत्व विभागानेही तपास होईपर्यंत काम थांबवण्याचे पत्र महापालिकेला दिले. त्यानंतर ट्रस्टीने महाराष्ट्र स्टेट वक्फ ट्रिब्युनलमध्ये दावा दाखल केला व तो मागेही घेतला. त्यानंतरही काम सुरूच ठेवल्याने महापालिकेने फरासखाना पोलिस व पोलिस आयुक्तांनाही 2021 मध्ये काम बंद करण्यासाठी पत्र दिले होते. त्यानंतर जून 2023 मध्ये जागेवर बीट बांधकाम, प्लॅस्टर, दरवाजे, खिडक्या असे काम झाल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आल्याने 24 ऑगस्ट रोजी ट्रस्टींना नोटीस बजावण्यात आली आहे.

लवकरच कार्यवाही

या कामावर कारवाई करण्यासंदर्भात पुढील तीन दिवसात पोलिस प्रशासन आणि इतर विभागांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT