जपानमध्ये चक्क हसणे शिकवणारा अनोखा क्लास! | पुढारी

जपानमध्ये चक्क हसणे शिकवणारा अनोखा क्लास!

टोकियो : एक थेरपी म्हणून ‘हास्ययोग’ करणे वेगळं आणि हसणंच विसरल्याने ते शिकण्यासाठी क्लास लावणं वेगळं! हसणं किंवा रडणं कुणाला शिकवावं लागत नाही. खरं तर या गोष्टी आपल्याला जन्मजातच मिळत असतात. मात्र, जपानमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. इथं लोक हसण्यासाठीही पैसे देत आहेत. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, मात्र हे अगदी खरंय. याला कारण ठरलय कोरोना..कोरोनाची लाट आली आणि लोकांच्या चेहर्‍यावर मास्क आले. मास्कमुळे लोक हसणंही विसरून गेले. त्यामुळेच आता हसण्यासाठी क्लास लावण्याची वेळ जपानी लोकांवर आली आहे!

टोकियो आर्ट स्कूलमधील हे चित्र बरंच काही सांगून जातं. इथे बरेचसे विद्यार्थी हसण्याचा सराव करीत आहेत. कुणी हाताने गाल ओढून हसतंय तर आरशात बघून हसण्याचा प्रयत्न करतंय. स्माईल कोच किको कावानो यांच्या क्लासमध्ये चक्क पैसे देऊन हसण्याचे ट्रेनिंग घेतलं जातंय.

अनेक जण कोरोना काळात एकाकी होते, त्यामुळे त्यांना हसण्याचा विसर पडला, आता त्यांना मोकळेपणाने व्यक्त व्हायचंय, असं स्माईल कोच किको कावानो म्हणतात. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर सरकारने नियम शिथिल केले आहेत. तरीही जपानमधील 8 टक्के लोक मास्क वापरणं सोडलेलं नाही. सतत मास्क लावल्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी कसं वावरायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. माझ्यासाठी नक्कीच हा एक वेगळा अनुभव आहे. मला माझ्या भावनांना वाट मोकळी करून द्यायचीय.

संबंधित बातम्या

कोरोनामुळे आमचं हसणं, आमचे हावभाव सारं काही हरवून बसलं होतं, असं जपानी नागरिक म्हणतात. दरम्यान, हसण्याचे क्लास घेणारी किका कावानो ही रेडिओ होस्ट आहे. 2017 मध्ये तिने स्माईल कंपनी सुरू केली. कोव्हिड काळात त्यांच्या कंपनीला खूपच प्रसिद्धी मिळाली. ती लोकांना केवळ हसायला शिकवत नाही तर त्यांना हसण्याचे फायदेही समजावून सांगते. तिच्या एका तासाच्या क्लासची फी जवळपास 4 हजार 500 रुपये इतकी आहे. अर्थात हे फक्त जपानमध्ये होऊ शकतं, भारतीय लोक इतके हसरे आहेत की त्यांना या क्लासची निश्चितच गरज भासणार नाही!

Back to top button