पुणे

डिंभा उजव्या कालव्याला भगदाड

अमृता चौगुले

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा :  हुतात्मा बाबू गेनू सैद जलसागर (डिंभे धरण)च्या उजव्या कालव्याला सविंदणे (ता. शिरूर) जवळील लंघे मळा कामठेवाडी या दरम्यान जाणाऱ्या डिंभे उजव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. हे भगदाड गेली वर्ष-दीड वर्ष आहे त्या स्थितीत आहे. याकडे लक्ष द्यायला पाटबंधारे विभागाला वेळ नाही, असा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. डिंभे उजवा कालवा आंबेगावसह, शिरूर तालुक्याला व पुढे श्रीगोंदा, कर्जत (जि. नगर) या भागाला वरदान ठरला आहे.

या उजव्या कालव्याचे अस्तरीकरण बऱ्याच ठिकाणी उखडले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. लंघे मळा या ठिकाणी पडलेले मोठे भगदाड पाटबंधारे विभागाला दिसत नाही. मात्र, एखाद्या शेतकरी किंवा सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या गावाने कालव्यातून लोखंडी पाइप टाकण्यासाठी दोन्ही बाजूला थोडे जरी खोदले तर हेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी साइडवर येऊन दमदाटी करतात आणि कायद्याची भाषा वापरतात. पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी कालव्याची ही भगदाडे आधी दुरुस्त करून कालव्याच्या पाण्याची गळती रोखावी, अशी मागणी सविंदणे येथील सरपंच शुभांगी विठ्ठल पडवळ, माजी सरपंच वसंत पडवळ, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पडवळ व शेतकऱ्यांनी केली आहे.

आवर्तन असल्याने सध्या दुरुस्ती नाही
सध्या डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडले असून, दोन दिवसांत या ठिकाणी पाणी येईल. त्यामुळे जोपर्यंत कालव्याला पाणी आहे, तोपर्यंत येथील भगदाड दुरुस्त करता येणार नाही, असे दै. 'पुढारी'शी बोलताना काही शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT