Political News Pudhari
पुणे

Political News: ऐऱ्या-गैऱ्याला महत्त्व देत नाही; वळसेंची मोहिते यांच्यावर टीका

.भीमाशंकर:खेड-आंबेगाव‌’ या प्रकरणावरून मोहिते पाटील यांनी वळसे पाटील आणि खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यावर केलेल्या टीकेला वळसे यांनी उत्तर दिले.

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: कोण बोलते यालाही किंमत असते, ऐऱ्या-गैऱ्याला मी महत्त्व देत नाही, अशी टीका माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वपक्षीय खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर केली आहे. ‌‘भीमाशंकर:खेड-आंबेगाव‌’ या प्रकरणावरून मोहिते पाटील यांनी वळसे पाटील आणि खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यावर केलेल्या टीकेला वळसे यांनी उत्तर दिले.

आ. बाबाजी काळे यांचे बंधू ॲड. विलास रामचंद्र काळे यांचे नुकतेच निधन झाले. या परिवाराला भेट देण्यासाठी शुक्रवारी (दि 22) वळसे पाटील पाडळी येथील काळे यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी मोहिते पाटील यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. आ. बाबाजी काळे, ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष विष्णू हिंगे, बाजार समिती संचालक हनुमंत कड, दत्ता सातपुते व इतर यावेळी उपस्थित होते.

वळसे म्हणाले, क्षमता नसलेल्या लोकांनी रडगाणे सुरू ठेवले आहे. मी आठ वेळा आमदार झालो. त्यांनी स्वतःला तपासून पाहावे. मी विकासकामात राजकारण करीत नाही. चासकमान धरणाच्या परिसरातील कळमोडी प्रकल्प रखडलेला आहे. आमदार बाबाजी काळे आणि आपण त्यावर काम करत आहोत.

रद्द झालेल्या पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत आपण काही बोलू शकत नाही, याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना माहिती विचारा, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर वळसे पाटील यांनी स्पष्ट केले, ते म्हणाले, मंत्री, आमदार असलो तरी खेड तालुक्यातील राजकीय, सामाजिक वर्तुळात कोणत्याही प्रकारचे अधिकार गाजवले नाहीत. भीमाशंकर देवस्थानच्या विकासावरून वाद निर्माण होत असतील तर मंदिर आणि विकास आराखड्याला खेडचेच नाव राहू द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT