

तुषार झरेकर
आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरीत पुन्हा एकदा दानपेटीतील रकमेच्या अफरातफरीचा प्रकार उघडकीस आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंदिर प्रशासनाने विश्वासाने जबाबदारी दिलेल्या सेवेकऱ्यानेच दानपेटीतील रोकड लंपास केल्याचा आरोप समोर आला असून, याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या देखरेख आणि आर्थिक नियंत्रण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात १२, १३ आणि १६ मे २०२६ रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत हा प्रकार घडला. मंदिरात सेवेकरी म्हणून कार्यरत असलेला विशाल वारुळे (वय ३३) याच्याकडे दानपेटीतील रक्कम कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी होती. दानपेटीतील पैसे बकेटमध्ये भरत असताना आरोपीने नजर चुकवून काही रक्कम स्वतःजवळील पिशवीत टाकल्याचा आरोप आहे.
मंदिर परिसरातील फुलांचे हार ठेवण्याच्या ठिकाणी जाऊन तेथून कॅशियरकडे पैसे जमा करण्यासाठी नेत असल्याचे भासवत आरोपीने तीन दिवसांत प्रत्येकी सुमारे पाच हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांची रोकड चोरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी फिर्याद दिली असून, आळंदी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, ही घटना उघड झाल्यानंतर संस्थान कमिटीच्या निष्काळजीपणावरही जोरदार टीका होत आहे. याआधीही संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर परिसरात समाधीवरील पैसे चोरीस जाण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्या वेळी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याऐवजी प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आळंदीमध्ये वारंवार होत आली आहे. परिणामी, मंदिरातील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा अभाव असल्याचे आरोप पुन्हा एकदा पुढे आले आहेत.
विशेष म्हणजे, समाधीवरील पैसे चोरणाऱ्या काही पुजाऱ्यांविरोधातही पूर्वी ठोस कारवाई झाली नसल्याची भावना भाविकांमध्ये आहे. त्यामुळे संस्थान कमिटी नेमकी कोणाच्या संरक्षणासाठी काम करते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंदिरातील दानपेट्यांची मोजणी, सीसीटीव्ही देखरेख, स्वतंत्र लेखापरीक्षण आणि जबाबदार कर्मचाऱ्यांची नियमित चौकशी यासारख्या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष होत असल्यानेच अशा घटना वारंवार घडत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
भाविकांच्या श्रद्धेवर उभ्या असलेल्या संस्थानमध्येच जर आर्थिक गैरव्यवहार होत असतील, तर ही केवळ चोरीची घटना नसून व्यवस्थेच्या अपयशाची गंभीर कबुली असल्याची प्रतिक्रिया आळंदी परिसरातून उमटत आहे.