Dilip Mohite Patil vs Babaji Kale Pune Political News
खेड: विधानसभा निवडणुकीत खोटी प्रतिज्ञापत्र सादर करून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्या प्रकरणी खेडचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आरोपात तथ्य निष्पन्न झाल्यामुळे न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. भविष्यात खेड- आळंदी मतदार संघातील मतदारांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागेल, असा दावा करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्यावर टीका केली. आज (दि ४) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रशासकीय मंजुरी नसताना नदी पात्रात पूल उभारण्याच्या नावाखाली शिरोली, पठारवाडी येथे प्रवाहाला अडथळा केला. स्व-निधीतून ही कामे केल्याचे ते सांगत आहेत. तर या गावात काम करून त्या गावात निधी टाकून त्याची बिले काढली जात आहेत. अशा कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली आहे. असेही मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.
सध्याचे आमदार मी मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजन करीत आहेत. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात त्यांना तालुक्यात कुठलाही निधी आणता आला नाही. माझी कामे पुढे करून फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात भामा आसखेड, चासकमान धरण परिसरातील पुल, बुडीत बंधारे आदींचा समावेश आहे. निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यात लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. विकासात खेड तालुका मागे राहत असल्याची जनसामान्यांची भावना आहे.
पाईट रस्त्यावर किवळे आणि लादवड या दोन्ही ठिकाणी पुलांची कामे केली. यातील लादवड पुलाचे काम आमदारांच्या पूर्वीच्या भागीदार असलेल्या ठेकेदाराने घेतले. जाणीवपूर्वक विलंबाने सुरू केले. पर्यायी रस्त्यावर पाणी साचून राहील, अशा उंचीवरच सिमेंट पाईप टाकून पूल केला. परिणामी पावसात हा रस्ता बंद राहिला. आमदारांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी आपण आग्रही होतो. यांना व यांच्या समर्थकांना ठेके मिळावेत म्हणून कंपनी मालक, अधिकाऱ्यांच्या हे बैठका घेत आहेत. महसूल व पोलीस अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागणी होत आहेत. ज्यामुळे अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करायला भाग पाडले जात आहे. या दोन्ही विभागात भ्रष्ट्राचार शिगेला पोहोचला आहे, असा आरोप दिलीप मोहिते पाटील यांनी केला.
खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने दोनची मर्यादा असताना दहा जणांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली. भागाभागात लागलेल्या फ्लेक्सवरून हे निदर्शनास येत आहे. अनेकाना गाजर दाखवून निवडणुका जिंकण्याचा येथुन प्रयत्न होत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यात आपण एकटे विरोधात सगळ्या पक्षाचे विरोधक अशी लढाई होईल. असे मोहिते पाटील म्हणाले.