Youth Letter Writing Pudhari
पुणे

Digital Detox Campaign: ‘व्हॉट्सॲप’च्या युगात पत्रलेखनाची पुन्हा गोडी; टपाल विभागाचे ‘डिजिटल डिटॉक्स’ अभियान

जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त उपक्रमाला वेग; तरुणाईला कागद-पेनच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘प्रिय’, ‘सप्रेम नमस्कार...’ पासून सुरू होणारे पत्र... कागदावर उमटणारे ओळखीचे हस्ताक्षर... शब्दाशब्दांतून व्यक्त होणारी आपुलकी... आणि पत्र येण्याची आतुरतेने वाट पाहणारी नजर... कधीकाळी संवादाचा अविभाज्य भाग असलेले हे चित्र आता डिजिटल युगात हरवत चालले आहे. ‘मेसेज केला का?’, ‘व्हॉट्सॲपवर पाठवतो’, ‘कॉल करतो’ या काही सेकंदांत संपणाऱ्या संवादाने पत्रलेखनाची जागा घेतली आहे.

पण, असे असले तरी कागदावर मनातील भावना उतरवण्याची ही हरवलेली सवय पुन्हा रुजविण्यासाठी टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे. ‘डिजिटल डिटॉक्स कॅम्पेन’च्या माध्यमातून तरुणाईला काही काळ डिजिटल माध्यमांपासून दूर नेत कागद-पेनच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्यास प्रवृत्त केले जात आहे. मंगळवारी (दि. १) साजऱ्या होणाऱ्या जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

डिजिटल माध्यमांमध्ये हरवत चाललेली पत्रलेखनाची सवय पुन्हा रुजावी, यासाठी टपाल विभागाकडून ‘डिजिटल डिटॉक्स कॅम्पेन’ राबविण्यात येत आहे. पुणे विभागात मागील महिन्यात एका कॅफेमध्ये हा उपक्रम राबवला हाेता. पुढील काळात विभागीय स्तरावर विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे पोस्ट विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळवले. दरम्यान, मी माझ्या नातेवाइकांना आणि मित्र-मैत्रिणींना वर्षभरातून एकदा तरी पत्र पाठवते, असे नोकरदार नेहा चव्हाण यांनी सांगितले.

स्पर्धेतून पत्रलेखनाची गोडी

नव्या पिढीमध्ये पत्रलेखनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी टपाल विभागाने पत्रलेखन स्पर्धेचेही आयोजन केले आहे. यासाठी १८ वर्षांपर्यंत आणि १८ वर्षांवरील, असे दोन वयोगट केले आहेत. डिजिटल संवादाच्या सवयीमध्ये वाढलेल्या तरुणांना कागद, पेन आणि हस्ताक्षराच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याचा अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT