Digital Arrest Death:
पुण्यातील ८२ वर्षाच्या महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त सरकारी अधिकाऱ्याचा डिजीटल अरेस्टमध्ये तब्बल १.१९ कोटी रूपये गमावल्याच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची माहिती त्यांच्या ८० वर्षाच्या पत्नीनं पुणे सायबर क्राईम पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान दिली.
हा डिजीटल अरेस्टचा खेळ १६ ऑगस्ट पासून १७ सप्टेंबर पर्यंत चालला होता. या फ्रॉडवेळी कॉल करणाऱ्या संबंधित व्यक्तीनं ते मुंबई पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचा दावा करत होते. हे वयस्कर जोडपं पुण्यातील विश्रांतवाडी येथे राहत होतं. फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीनं या वयस्कर जोडप्याला एका एअरलाईन मालकानं मनी लाँडरिंग करण्यासाठी तुमच्या आधार आणि बँक अकाऊंटचा वापर केला गेलाय असं सांगितलं होतं.
संबंधित व्यक्तीनं तो आयपीएस अधिकारी असल्याचं आणि सीबीआयमध्ये काम करत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर या वयस्कर जोडप्याला तुम्ही हाऊस अरेस्टमध्ये रहा किंवा जेलमध्ये जावं लागेल यापैकी एकाची निवड करता असं सांगितलं होतं. फ्रॉड करणाऱ्यांनी या जोडप्याला त्यांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरू करण्यास सांगितले होते. हा प्रकार तीन दिवस चालला. त्यादरम्यान त्यांनी त्यांचे बँक अकाऊंट आणि आधार डिटेल्स मिळवले. त्यांची एका खोट्या केसमध्ये चौकशी करत असल्याचा आव आणला होता.
दरम्यान, गेल्या मंगळवारी निवृत्त अधिकाऱ्याच्या पत्नीनं पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, त्यांचे पती काही दिवसांपूर्वी बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र २२ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पुणे सायबर क्राईम विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली आहे.