पुणे : पुढारी वृत्तसेवा : रुग्णाला खर्च परवडत नसल्याने एका खासगी रुग्णालयाने अवघड असलेली जबड्याची शस्त्रक्रिया (मँडीबुलर सबकाँडाइल) न करताच त्याला रेल्वे रुग्णालयात पाठवून दिले. मात्र, रेल्वे रुग्णालयाने खर्चाची पर्वा न करता त्या रुग्णावरील अतिशय अवघड असलेली जबड्याची ही शस्त्रक्रिया यशस्वी करून त्याला जीवदान दिले. या कार्याबद्दल रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक होत आहे.रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे रुग्णालयात 'मँडीबुलर सबकाँडाइल' म्हणजेच जबड्यावरील शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. याकरिता रेल्वे रुग्णालय प्रशासनाने कठोर परिश्रम घेऊन रुग्णाला शक्य तितकी मदत केली.
शल्यचिकित्सक आणि भूलतज्ज्ञांसमोर होते आव्हान
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मँडिब्युलर सबकाँडाइलने ग्रस्त असलेल्या रुग्णावर ओपन रिडक्शन आणि इंटरनल फिक्सेशन (ओआरआयएफ) शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी डॉक्टरांना 5 तास 45 मिनिटे लागली. रुग्णाला पाच दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्याने शस्त्रक्रिया न करताच त्याला रेल्वे रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून रेल्वे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शल्यचिकित्सक आणि भूलतज्ज्ञ यांच्यासाठी ही एक आव्हानात्मक केस होती. शस्त्रक्रियेनंतर रुग्णास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे.
सहा लाखांची शस्त्रक्रिया फक्त 30 हजारांमध्ये केली
या शस्त्रक्रियेसाठी पॅनेल/खासगी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्यास अंदाजे 6 लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र, पुण्याच्या रेल्वे रुग्णालयात ही शस्त्रक्रिया अवघ्या तीस हजार रुपयांमध्ये इम्प्लांट आणि सर्जन शुल्कासह करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी डॉ. प्रणय कुडे, डॉ. अंकित साह, डॉ. मिलिंद एन. डी., डॉ. अंकिता, डॉ. नवीन कुमार यांच्यासह नर्सिंग आणि सपोर्ट स्टाफसह रेल्वे डॉक्टरांच्या चमूने मोठे योगदान दिले.
रेल्वे अधिकार्यांकडून कौतुक
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, मुख्य वैद्यकीय अधीक्षक संजीव यांच्यासह रेल्वे डॉक्टर, अधिकारी यांनी या स्तुत्य कार्याबद्दल पुणे रेल्वे रुग्णालयाच्या टीमचे अभिनंदन केले.
हेही वाचा :