

सोलापूर ः महेश पांढरे पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा 13 टक्के कमी पाऊस पडला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील 164 गावातील तीन लाख 28 हजार 229 नागरिक व एक लाख 20 हजार 347 पशुधनाला 174 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात निसर्गराजाच्या कृपादृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांतील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होते. अनेक नद्यांना पूर आल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्याची वेळ प्रशासनावर येते, मात्र यंदाच्या पावसाळ्यात निसर्गराजाने या जिल्ह्यांवर अवकृपा केली आहे.
पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग वगळता इतर ठिकाणी पावसाने तब्बल महिनाभरापेक्षा अधिक काळ दडी मारली आहे. त्यामुळे या भागातील खरीप पिके धोक्यात आली आहेत. सोलापूर, सांगली, सातारा या भागातील खरीपाच्या पिकांचे 70 ते 80 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. या भागात आता दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही धरणे भरली असली तरी सोलापूर, सांगली, सातारा या भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चलली आहे.
येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न पडल्यास या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची वेळ शासनावर येणार आहे. या भागातील जवळपास 164 गावांत सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पावसाने जर वेळेवर हजरी लावली नाही तर या भागात टँकरची मागणी वाढणार आहे. जनावरांसाठी चारा डेपो अथवा चारा छावण्या सुरू कराव्या लागणार आहेत. पण यापेक्षा निसर्गाने साथ देण्याची अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे.
ज्या भागात टंचाई निर्माण झाली आहे, त्या भागात उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या चार्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.