धायरी गाव दोन पोलिस ठाण्यांत विभागले! नागरिक हैराण, गुन्हेगार मोकाट Pudhari
पुणे

Dhayari police jurisdiction issue: धायरी गाव दोन पोलिस ठाण्यांत विभागले! नागरिक हैराण, गुन्हेगार मोकाट

फिर्याद कुठे द्यायचीच कळत नाही; स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी, ‘आप’कडून गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला : सिंहगड रस्ता परिसरात सर्वाधिक लोकसंख्या आणि गुन्हेगारी असलेल्या धायरी परिसराचे सिंहगड रोड व नांदेड सिटी, अशा दोन पोलिस ठाण्यांत विभाजन करण्यात आले आहे. त्याचा फटका धायरीकरांना सहन करावा लागत आहे. हद्द माहीत नसल्याने नागरिकांना कोणत्या पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करावी, हेच समजत नाही. त्यामुळे वेळेवर फिर्यादी दाखल होत नाही तसेच गुन्हेगारही मोकाट फिरत असल्याने परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.(Latest Pune News)

खून, जबरी चोऱ्या अशा गंभीर गुन्ह्यांसह किरकोळ चोऱ्या, अपघात, दुर्घटना या परिसरात वाढल्या आहेत. शहरातील गुन्हेगारांचे या परिसरात वास्तव्य वाढले आहे. त्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी संपूर्ण धायरी गाव व परिसराचा नांदेड सिटी पोलिस ठाण्यात समावेश करण्यात यावा व गावात स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या समस्येकडे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर व नागरिकांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नांदेड सिटी पोलिस ठाण्यात धायरीचा समावेश होणार होता. मात्र, धायरी गावचे दोन तुकडे करून निम्मे गाव नांदेड सिटी पोलिस ठाण्यात, तर अर्धे गाव सिंहगड रोड पोलिस ठाण्याला जोडले गेले आहे. एकच गाव दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांना जोडण्यात आले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, मोलमजुरी करणारे कामगार, सर्वसामान्य गृहिणी यांना फिर्याद दाखल करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच हेलपाटेही मारावे लागत आहेत.

पोलिस यंत्रणेवरही ताण

सण, उत्सवांच्या मिरवणुकांना परवानग्या घेतानासुध्दा पोलिस ठाण्यांत न जाता सहायक पोलिस आयुक्तांकडे जावे लागत आहे. तसेच अपघात झाला, तर मुख्य रस्ते दोन्ही पोलिस ठाण्यांना अर्धेअर्धे विभागून दिले असल्यामुळे पोलिस यंत्रणेवरसुध्दा ताण येत आहे. तक्रार द्यायला गेलेले नागरिक फिरून फिरून कंटाळून तक्रार देण्याचे टाळत आहे. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT