पुणे: धायरी फाटा येथील 'आमदार रमेश वांजळे उड्डाणपुला'ला मोठी भेग पडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने मंगळवारी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पावसामुळे पुलाला धोका निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. मात्र, महापालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि हा पुलाचा तांत्रिक सांधा (ज्वाइंट एक्सपांशन) असून पुलाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नाही, असा खुलासा महापालिकेच्या प्रकल्प विभागाने दिला आहे.
पुण्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसात धायरी फाटा उड्डाणपुलावर रस्त्याला आणि कठड्याला जोडणाऱ्या भागात एक मोठी भेग नागरिकांच्या निदर्शनास आली. शिवसेनेचे विभागप्रमुख महेश पोकळे यांनी या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत मंगळवारी सकाळीच महापालिकेचे उच्चाधिकारी, संबंधित ठेकेदार आणि तांत्रिक सल्लागार (कन्सल्टंट) यांनी पुलाची सविस्तर पाहणी केली.
हा पूल ज्या ठिकाणी बांधला आहे, तिथे मोठा कालवा आणि छोटा कालवा असे दोन कालवे वाहतात. दोन्ही कालवे एका पातळीत नसल्यामुळे पुलाचे बांधकाम करताना तिथे 'तिरपे गर्डर' टाकावे लागले आहेत. त्यावर लोखंडी प्लेट, सिमेंट काँक्रीट आणि त्यावर डांबराचा थर दिला आहे.
या पुलाला १५ वर्षे पूर्ण झाली असून, दोन गर्डरच्या सांध्यामध्ये पुलाचा अवजड वाहनांमुळे येणारा ताण आणि विस्तार सहन करण्यासाठी 'ज्वाइंट एक्सपांशन' साठी जागा सोडलेली असते. पूर्वी या जागेवर डांबराचा थर असल्याने ही भेग दिसत नव्हती. परंतु, सततचा पाऊस आणि अवजड वाहनांमुळे डांबराचा थर उखडल्याने ही भेग उघडी पडली आहे, असे प्रशासनाने स्पष्ट करत पुलाला कोणताही धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा उड्डाणपुलाचा तांत्रिक सांधा असून, तो बांधकाम करताना मुद्दाम रिकामा ठेवला जातो. केवळ त्यावरील डांबराचा थर निघाल्यामुळे ही भेग दिसत आहे. उड्डाणपुलाला आणि त्याच्या रचनेला कोणताही धोका नाही. या सांध्याची दुरुस्ती आणि डांबरीकरणाचे काम महापालिकेकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे.दिनकर गोजारे, प्रमुख, प्रकल्प विभाग, महापालिका