पौड : पुणे ते कोलाड महामार्गावरील पौडजवळील धनवेवाडी ते सुर्वेवाडी यादरम्यानचा रस्ता गेल्या सात वर्षांपासून रखडला होता. या काळात येथे शंभरहून अधिक अपघात झाले. त्यात काही जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर या रस्त्याच्या कामाला आता मुहूर्त मिळाला आहे. सध्या दारवली बसस्टॉपसमोरील रस्त्याचे काम अखेर सुरू झालेले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांसह प्रवशांनाही दिलासा मिळणार आहे. (Latest Pune News)
2018 साली पुणे ते कोलाड या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम भूमिपूजन होऊन सुरू झाले. चांदणी चौक ते ताम्हिणी घाट हे अंतर जवळपास 70 किलोमीटर आहे. कोरोनाकाळात काही काळ हे काम बंद होते. रोडवेज कंपनीकडून वेगाने सुरू असलेले काम काही ठिकाणी हरकती आल्यानंतर अपूर्ण ठेवण्यात आले होते. धनवेवाडीजवळील हॉटेल चूल आंगण ते दारवली बसस्टॉपजवळील ओढा हे पाचशे मीटरचे कामही हरकत घेतल्यानंतर गेली सात वर्षे बंद अवस्थेत होते.
पौड घाट उतरून आल्यानंतर धनवेवाडी बसस्टॉपच्या पुढे हॉटेल चूल आंगणसमोर रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी सुरू होती. उताराने व सपाट भागावरून वेगात आल्यानंतर पुढे रस्त्याची बंद असलेली बाजू सहज दिसत नाही. मात्र, हे बंद काम अचानकच चालकांना समोर दिसते. त्यामुळे या ठिकाणी जवळपास शंभराहून अधिक अपघात झाले आहेत. यामध्ये चार ते पाच जणांचा मृत्यूही झाला, तर अनेक जण जखमी झाले. पूर्वी डांबरीकरण होते तेवढाच रस्ता करण्यास येथील शेतकऱ्यांनी परवानगी दिली आहे.
त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून या ठिकाणी अपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. सिमेंट काँक्रिटीकरणाची होत असलेली बाजू पाच मीटर होणार असून, हॉटेल चूल आंगण ते दारवली बसस्टॉपजवळील ओढा आता सरळ रस्ता होणार आहे. त्यामुळे आता पुण्याकडून पौडकडे जाणाऱ्या गाड्यासाठी या ठिकाणी अपघाताचा धोका कमी झाल्याने वाहनचालकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
न्यायालयात याचिका दाखल
या ठिकाणी रस्ता होण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ, खासदार, आमदार, तहसीलदार, पोलिस निरीक्षक तसेच सर्वच राजकीय प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मात्र, न्यायालयात याचिका दाखल असल्याने या ठिकाणी रस्ता करण्यास ठेकेदार असमर्थ होता. त्यामुळे येथे रस्ता होत नव्हता.