Dhanori Encroachment Removal Pudhari
पुणे

Dhanori Encroachment Removal: धानोरीत महापालिकेची धडक कारवाई; 11,200 चौ.फूट सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त

भारत माता मार्केट व फिश मार्केट परिसरात जेसीबीची कारवाई, अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे : धानोरी परिसरातील वाढत्या अतिक्रमणांवर पुणे महापालिकेने जोरदार कारवाई करीत तब्बल 11,200 चौ.फूट सार्वजनिक जागा मोकळी केली. पत्राशेड स्वरूपात उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालवत प्रशासनाने भारतमाता मार्केट आणि फिश मार्केट परिसर अतिक्रमणमुक्त केला. शहरातील सार्वजनिक जागा पुन्हा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.

अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सहायक आयुक्त प्रकाश वालगुडे यांच्या नियंत्रणात पथकाने धानोरीतील भारत माता मार्केट परिसरातील सुमारे 5,100 चौ. फूट आणि भारतमाता रोडवरील फिश मार्केट परिसरातील अंदाजे 6,100 चौ.फूट क्षेत्रातील पत्राशेड हटविले. त्यामुळे एकूण 11,200 चौ.फूट जागा पुन्हा सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध झाली आहे.

महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांत अनधिकृत स्टॉल, पत्राशेड व बाजारपेठांमधील वाढते अतिक्रमण यामुळे वाहतूककोंडी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या हालचालींना अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त नवलकिशोर राम यांच्या निर्देशानुसार अतिक्रमणविरोधी मोहीम अधिक तीव करण्यात आली आहे.

उपायुक्त बनकर यांनी सांगितले, की शहर स्वच्छ व शिस्तबद्ध ठेवण्याच्या उद्देशाने अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार आहेत. वाढत्या अतिक्रमणांमुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासन कठोर भूमिका घेत आहे.

आगामी काळात आणखी व्यापक आणि निर्णायक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ज्यांना अतिक्रमणाबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत,

त्यांनी ठराविक मुदतीत स्वतःहून अतिक्रमण हटवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कारवाईला अडथळा आणण्याचा किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT