पुणे : महाराष्ट्रामध्ये धनगर समाज लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये धनगर समाजाला डावलले जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. महायुतीकडून समाजाला मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाला धनगर समाज मतदान करणार नाही, अशी भूमिका यशवंत संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कुऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
कुऱ्हाडे म्हणाले, महायुतीने डावलले आहे. महाविकास आघाडीकडूनही अपेक्षा होत्या मात्र त्यांनीसुद्धा धनगर समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. आजपर्यंत चळवळीत सातत्याने काम करणाऱ्या, संघर्षातून पुढे आलेल्या निष्ठावंत नेत्यांना कोणत्याही पक्षाकडून योग्य संधी देण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्षांसाठी धनगर समाजाने प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केले आहे, तरीदेखील निर्णयप्रक्रियेत समाजाला स्थान दिले जात नाही. येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज आपली भूमिका ठामपणे मांडेल आणि आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही.
महायुतीकडून असलेल्या अपेक्षा आता संपलेल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी, हीच समाजाची ठाम मागणी असल्याचे ही कुऱ्हाडे यांनी यावेळी सांगितले.