Vaishnavi Hagawane Death
पुणे : रुपाली चाकणकर यांच्या अकार्यक्षमतेच्या विरोधात जनतेला आवाज उठवण्याचा अधिकार आहे. त्यांनी स्वतःची अकार्यक्षमता ओळखून राजीनामा द्यावा, अशी मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी शुक्रवारी (दि.२३) केली.
जाधव म्हणाले, वैष्णवी हगवणे यांच्या हत्येप्रकरणी राज्य महिला आयोग अकार्यक्षम ठरलेले दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर केवळ पद मिरवताना दिसतात. परंतू, प्रत्यक्ष कृती करताना दिसत नाहीत. चाकणकर या पुण्यात धायरीला राहतात. परंतू, त्यांना पुण्यातील वाकड येथील कस्पाटे कुटुंबियांची भेट घ्यायला ८ दिवस लागतात. त्या सोशल मीडियावर सक्रीय असतात.व त्यांच्याविषयी लिहणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करतात. परंतू, महिलांना न्याय देताना त्या दिसत नाहीत, असेही जाधव यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगावर एक निष्क्रिय महिला अध्यक्ष असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा, असेही जाधव यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.