पुणे: काही लोक मनात येईल तशा पद्धतीने आश्वासन देत आहेत. ‘खिशात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा,’ असा त्यांचा व्यवहार आहे. त्यांना ही निवडणूक गल्लीबोळातील दादागिरीची वाटत आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही जे बोललो आहे ते करून दाखवले आहे. येणाऱ्या काळात पुण्याच्या विकासाचा 50 वर्षांचा प्लॅन आम्ही तयार केला असून, तसा विकास करणार आहोत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोफत मेट्रोसेवेच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
भाजपची ‘विजय संकल्प’ सांगता प्रचार सभा मंगळवारी गोखले नगर येथे पार पडली. या सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत पुण्याच्या विकासाचा प्लॅन सांगितला. सभेनंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यात मागच्या काही काळात काही लोकांनी बिनडोकपणे कामे केली. विद्यापीठ चौकातील पूल चुकीचा बांधण्यात आल्याने तो पाडावा लागला. मात्र, आम्ही नियोजन करत नवा पूल बांधला आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे. पुणे महापालिकेची यंदाची निवडणूक ही प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन आणणारी आहे. काही लोकांना ही निवडणूक जातीय चौकटीत अडकवायची आहे. मात्र, ही निवडणूक शहराची भवितव्य ठरवणारी आहे.
फडणवीस म्हणाले, पुणे हे जागतिक दर्जाचे शहर आहे. पुण्यात 110 किमीचे मेट्रो जाळे उभारण्यात येत आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात असून, याच वर्षी लोकार्पण होईल. गेल्या पाच वर्षांत 35 हजार कोटींचे 220 प्रकल्प पूर्ण करण्यात आले, तर पुढील 5 वर्षांसाठी 44 हजार कोटींच्या प्रकल्पांचे नियोजन आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 32 प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण तसेच 23 नवीन उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती आणली!
देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, काल मी पुराव्यासहित उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती कशी आणली, ते दाखवले आहे. राज ठाकरेंचे आता बंधूंशी पटायला लागले. त्यामुळे त्यांनी माझ्याशी बोलण्यापेक्षा बंधूंशी बोलायला हवे. आपल्या भाषेवर संकट आणणारे त्यांचे बंधू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने मला तीन वेळा मुख्यमंत्री बनवलं. जनता कोणाच्या बाजूने आहे हे निवडणुकीत कळलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंना मी बसवलेला वाटत असेल तर त्यात हरकत नाही.
...तर मी स्वत: त्यांना तिकीट काढून देईन
अजित पवार यांच्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे. मी आधीच सांगितलं होतं की आमची युती होणार नाही, मात्र, आम्ही मैत्रिपूर्ण लढत करू. मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण अजितदादांनी ते पाळलं नाही. अजितदादांना दिल्लीत आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला जाणार असेल तर ते जाऊ शकतात. त्यांना विमानसुद्धा देण्याची व्यवस्था मी करेन, तिकीटही काढून देईल, जोपर्यंत आमच्या वरिष्ठांना भेटतात, तोपर्यंत मी आनंदी आहे. दोन महानगरपालिकांंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. 27 महानगरपालिकांत विरोधात लढत आहेत. त्याच्यावर इतकी चर्चा का करायची? असा सवालही फडणवीस यांनी केला.
नगरसेवक चोरून नेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मत चोरीच्या संदर्भात बोलू नये. त्यांच्यावर नगरसेवकचोरीचा आरोप आहे. राज ठाकरेंचे सगळे नगरसेवक चोरून नेण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. लोकांच्या मताने निवडून आलेले नगरसेवक त्यांनी चोरायचे हे गंभीर आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
...त्यांनी जास्तीत जास्त लखपती दीदी घडवाव्यात
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात 50 लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत, तर पुढील 4-5 महिन्यांत ही संख्या 1 कोटीवर नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. या मतदारसंघात पुढील वेळी येताना किती महिलांना लखपती दीदी केले, याचा हिशोब मी नगरसेवकांकडे मागेन. ज्यांना पदे हवी आहेत, त्यांनी जास्तीत जास्त लखपती दीदी घडवाव्यात,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.