पुणे

सर्वसामान्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच; देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी साकडे

अमृता चौगुले

बावडा : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, सामान्य माणूस यांना न्याय मिळत नाही. त्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा संपणार नाही, त्यासाठी राज्य सरकारला जेरीस आणू. या लढाईसाठी श्री लक्ष्मी-नृसिंहाने आम्हास आशीर्वाद द्यावेत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर येथे इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या स्वागत सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचेसह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. राहुल कुल, आ. राम सातपुते, पृथ्वीराज जाचक, रंजनकाका तावरे, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अंकिता पाटील, हनुमंतराव सूळ, धैर्यशील मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, श्री लक्ष्मी-नृसिंहाने अनाचारी वृत्ती, अत्याचार वृत्ती विरोधात लढण्याची ताकद द्यावी, असे आशीर्वाद मी व हर्षवर्धन पाटील यांनी घेतले. श्री लक्ष्मी-नृसिंहाची ताकद सर्वांना माहिती आहे. नृसिंहाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे हर्षवर्धनजी काळजी करू नका, येथील सर्व विकासकामे पूर्ण होण्यास अडचण येणार नाही, असे त्यांनी भाषणात सांगितले.

मी सन 1997 ला नागपूरचा महापौर झाल्यावर येथे दर्शनाला आलो असता विकासाची इच्छा मनात आली. लक्ष्मी- नृसिंहाने आशीर्वाद दिला व 2014 ला मुख्यमंत्री झालो. त्यामुळे श्री लक्ष्मी-नृसिंह तीर्थस्थळ विकासाचा 264 कोटी रुपयांचा आराखडा सध्या पूर्ण होत आला आहे. या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, शंकरराव पाटील यांचेपासून कोणतीही निवडणूक असो अथवा विकासकाम असो येथील लक्ष्मी-नृसिंहाचा आशीर्वाद घेऊनच आम्ही शुभारंभ करतो. राज्यात जनतेची विकासकामात अडवणूक होत आहे, ती दूर करण्यासाठी राज्याचे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे लक्ष्मी-नृसिंहाकडे घातल्याचे देखील हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात नमूद केले.

इंदापूर तालुक्यातील जनता भाजपवर प्रेम करणारी आहे. फडणवीस व भाजपने आदेश द्यावा, इंदापूर तालुक्यातील जनता आपली ताकद दाखवून देईल, असे पाटील म्हणाले. आभार इंदापूर भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी मानले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT