राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या विकास आराखड्यास महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम मंजुरी दिली आहे. या खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे पुढील ४-५ दिवसात यासंबंधीचे परिपत्रक काढणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
राजगुरुनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०१८ मध्ये नगरपरिषदेकडून विकास आराखडा बनविण्यात आला होता. या विकास आराखड्यास मंजुरी मिळावी याकरता माजी खासदार आढळराव पाटील हे गेली तीन वर्षे मंत्रालयीन स्तरावर सातत्याने प्रयत्नशील होते. नुकतीच त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे व प्रधान सचिव भूषण गगराणी यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेत याबाबत तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी केली. आढळराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश येऊन या आराखड्यास मंजुरी मिळाल्याने पुढील काळात शहरातील विकासकामांना चालना मिळणार असून शहरातील प्रलंबित विकास कामे मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.
याबाबत आढळराव पाटील म्हणाले की, राजगुरुनगर शहराच्या बहुप्रतिक्षित विकास आराखड्यासाठी मंत्रालयीन स्तरावर मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे सचिव, उपसचिव आदींकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे शहराची महत्त्वाची पाणी योजना, अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था यासह विविध महत्त्वाचे प्रकल्प व पायाभूत सुविधांची कामे यापुढील काळात मार्गी लावण्यावर माझा विशेष भर असणार आहे.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरुनगर शहरावर माझे विशेष प्रेम आहे. येथील लोकांनीदेखील माझ्यावर विश्वास दाखवत आजवर मला भरभरून प्रेम दिले आहे. शहरातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून या ठिकाणी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांचे यथोचित स्मारक उभारले आहे. शहरातील नित्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पुलाची निर्मिती केली असून शहरातील अंतर्गत महामार्गाचे रुंदीकरणही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण करून घेतले आहे.
खेड घाट चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून प्रगतीपथावर असलेले राजगुरुनगर बाह्यवळण महामार्गाचे कामही लवकरच पूर्ण होऊन हे शहर पूर्णतः वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे. या आराखड्यामुळे शहरातील नागरिकांच्या सोयी- सुविधांमध्ये भरीव वाढ होऊन लोकांचा जीवनस्तर उंचावणार आहे. राजगुरुनगर वासियांच्या प्रेमापोटी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादनही यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी केले.
https://youtu.be/FEtlxeG0ZyM