पुणे

पुणे : निरोगी फुफ्फुसांसाठी ’डिटॉक्स’ आवश्यक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फुफ्फुसांमध्ये अनियंत्रितपणे वाढलेल्या हानिकारक पेशींमुळे कर्करोग उद्भवतो. विषाणूंचा प्रादुर्भाव, धूम्रपानासारख्या सवयी, वायूप्रदूषण अशा अनेक कारणांमुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे निरोगी फुफ्फुसांसाठी जीवनशैलीत बदल करून 'डिटॉक्स' अर्थात विषमुक्त करणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

फुफ्फुसांची हानी दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या उपचारपद्धतीला 'लंग डिटॉक्स' असे म्हटले जाते. 'डिटॉक्स' अर्थात खूप चांगला उपयोग होतो. यासाठी जीवनशैलीतील बदल अत्यंत आवश्यक आहेत. घराबाहेर पडल्यावर नाक आणि तोंड झाकलेले असल्यास वायूप्रदूषणाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे धूम्रपानाची घातक सवय तातडीने बंद करणे आवश्यक असते.

श्वासोच्छवासातून शरीरात जात असलेल्या हवेचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो. त्यामुळेच वाढते वायूप्रदूषण ही धोक्याची घंटा मानली जात आहे. घरातील हवेची गुणवत्ता योग्य राखणे आपल्या हातात असल्याने त्याबाबत काळजी घ्यायला हवी. त्यासाठी घरात शक्यतो स्वच्छतेसाठी रसायनमुक्त उत्पादनांचा वापर करावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

फुफ्फुसांची स्वच्छता करण्यासाठी कोणत्याही वेदनाशामक औषधांची गरज नसते. धूम्रपान, वायूप्रदूषणापासून दूर राहणे, श्वासाचे व्यायाम करणे आणि सकस आहार घेणे ही उत्तम पद्धत आहे. श्वसनाचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हलके व्यायाम करायला हरकत नाही. अँटिऑक्सिडंटयुक्त, जीवनसत्वयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश फुफ्फुसांसाठी उपयुक्त ठरतो.
डॉ. मीरा सहानी, कर्करोगतज्ज्ञ

धूम्रपानाची सवय असणारे, सतत रसायने आणि वायूंच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना फुफ्फुस निकामी होण्याचा धोका असतो. फायब्रोसिस, अस्थमा, क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीझ यांसारखे श्वसनाशी संबंधित आजार, अ‍ॅलर्जी असलेल्यांनाही फुफ्फुसांचा त्रास होतो. फुफ्फुसांचा जुनाट आजार असला तरीही नियमित व्यायाम हा निरोगी जीवनशैलीचा अत्यावश्यक भाग आहे. आहार हाही महत्त्वाचा घटक असतो. आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

डॉ. सुधीर रॉय, रुबी हॉल क्लिनिक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT